सैनिक बांधवांचा सन्मान हे प्रत्येकाचे कर्तव्यच : आमदार महेश लांडगे
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/78d41dcb-153a-4174-847b-6cd2c554bfa9.jpg)
स्वातंत्र्यदिनानिमित्त मोशीत माजी सैनिकांचा सन्मान व वाचनालय लोकार्पण
मोशी |प्रतिनिधी
देशाच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची पर्वा न करता सीमेवर सेवा बजावणाऱ्या सैनिकांचा सन्मान करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. याच भावनेतून आमदार महेश लांडगे यांच्या संकल्पनेतून सामाजिक कार्यकर्ते निलेश बोराटे यांच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त मोशीतील माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी शिवरस्ता येथे सार्वजनिक वाचनालयाचे लोकार्पण करण्यात आले.
देशाचे जवान सीमेवर अहोरात्र सेवा करत असताना, शत्रूशी दोन हात करताना त्यांच्यासाठी सर्व देशवासीय कुटुंबासमान असतात, आणि या देशासाठी प्राणांची बाजी लावण्याचीही त्यांची तयारी असते हीच जाज्वल्य देशभक्ती सर्वांनी जपण्याची गरज आहे. सीमेवर लढणारे जवान जसे आपल्या प्राणांची आपल्या कुटुंबाची पर्वा न करता सेवा करतात त्याच पद्धतीने कोरोना संकटात डॉक्टर्स, नर्सेस, आरोग्य कर्मचारी व पोलीस बांधवही आपल्या देशाचे रक्षणकर्ते आहेत, या सर्वांमुळेच आपला देश आणि देशवासीय सुरक्षित आहेत. अशा सैनिक बांधवांचा सन्मान करणे प्रत्त्येक भारतीयाचे कर्तव्यच आहे असे आमदार महेश लांडगे यांनी सांगितले.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने माजी सैनिक विजय आवटे, सूर्यकांत जगदाळे, जयवंत आल्हाट, विश्वास लोखंडे, गणेश गव्हाणे, माऊली पडवळ, विजयकुमार जगताप, सोमनाथ जंगम, हरीश साबळे, रामदास बोरुडे, पोपट सातपुते, दिपक जाधव, सचिन वैदकर या वीर सैनिकांना आमदार महेश लांडगे व माजी महापौर राहुल जाधव यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व मानपत्र देऊन गौरवण्यात आले.
सीमेवर लढणाऱ्या आणि बलिदान देणाऱ्या सैनिक बांधवांच्या देशसेवेचे त्यागाचे सर्व भारतीयांवर कधीही उतराई न होणारे उपकार आहेत. त्यांचा सन्मान करण्याचे भाग्य लाभल्याचे सांगत सामाजिक कार्यकर्ते निलेश बोराटे यांनी सर्वांचे आभार मानले.
वाचनालय लोकार्पण…
वाचनसंस्कृती जोपासण्यासाठी तसेच ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा मिळावा यासाठी मोशीतील शिवरस्ता परिसरात सामाजिक कार्यकर्ते निलेश बोराटे यांच्या माध्यमातुन सार्वजनिक वाचनालयाचे लोकार्पण करण्यात आले. तरुणांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी, विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजावी तसेच ज्येष्ठ नागरिकांना विरंगुळा मिळावा यासाठी अशी वाचनालये नक्कीच प्रेरणादायक ठरतील असे माजी महापौर राहुल जाधव यांनी यावेळी सांगितले.यावेळी मारुती जांभुळकर देखील उपस्थित होते.
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/08/e78a0eb2-ac9a-40a3-bfdb-aa0d85710c28-1024x620.jpg)