सिटी प्राईड शाळेत रमाबाई आंबेडकर जयंती साजरी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/02/Photo-10.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – क्रांतिसूर्य महात्मा ज्योतिबा फुले एज्युकेशन फौंडेशन संचालित न्यू सिटी प्राईड इंग्लिश मिडीयम स्कूलमध्ये रमाबाई आंबेडकर जयंती साजरी करण्यात आली.
रमाबाई यांच्या प्रतिमेस हेमा शेलार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी संस्थेचे संस्थापक अरुण चाबूकस्वार, शाळेच्या मुख्याध्यापिका श्राबनी पत्रनाभिष, मंजुळा मुदलियार, सामाजिक कार्यकर्ते तात्या शिनगारे, राजेश सुटे, राकेश भास्कर, रहीम शेख तसेच शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. यावेळी शाळेतील शिक्षकांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले.
रंजल्या-गांजल्यांची मातोश्री माता रमाईने अनेक हाल अपेष्टा सहन केल्या. भौतिक सुखाचा हव्यास न धरता या अशिक्षित मातेने बाबासाहेबांच्या कार्याला पुढे नेले. बाबासाहेबांची समाजाप्रती तळमळ पाहुन त्यांच्यामागे खंबीरपणे उभ्या राहिल्या, याची प्रेरणा प्रत्येकाने घेतली पाहिजे. रमाबाईंची सहनशीलता, सोज्वळता त्यागी व वात्सल्यवृत्ती, कष्ट, कामसू निर्मळपणा, स्वाभिमानी आदी गुणांचा आदर करून हे गुण आपल्या अंगी बाळगले पाहिजेत. त्याचप्रमाणे कठीण परीस्थितीवर मात करून कसे जीवन जगावे आणि फक्त जीवन जगणे नाही, तर ते आनंदाने व समाधानाने कसे जगावे, हा आर्दश घेतला पाहिजे, असे मार्गदर्शन संस्थापक अरुण चाबूकस्वार यांनी केले.
प्रियंका लाडे यांनी सूत्रसंचालन केले. रेणू राठी यांनी आभार मानले.