सावित्रीबाई फुले स्मारक समितीची बैठक; सदस्यांनी केल्या विविध मागण्या
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/DSC_6762-copy.jpg)
पिंपरी, (महा ई न्यूज) – पिंपरीतील सावित्रीबाई फुले स्मारक इमारतीमध्ये भव्य वाचनालय व ग्रंथालय सुरू करावे, सांस्कृतिक हॉलचे नामकरण करावे, महिलांसाठी विविध प्रशिक्षण वर्ग चालू करावेत. सर्व विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका चालू करावी. फुले दांपत्यावर चित्रफित तयार करावी. स्मारकाच्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंचा पूर्णाकृती पुतळा उभारावा, अशा विविध मागण्या स्मारक समितीच्या बैठकीत करण्यात आल्या.
पिंपरी-चिंचवड महापालिकेने पिंपरी येथे उभारलेल्या सावित्रीबाई फुले स्मारकात विविध उपक्रम चालू करण्यासाठी महापौर कार्यालयात महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. त्यावेळी नगरसेवक संतोष लोंढे, सह शहर अभियंता प्रविण तुपे, सहाय्यक आयुक्त मंगेश चितळे, आरोग्य, पाणी पुरवठा, अग्निशामक विभागाचे अधिकारी तसेच सावित्रीबाई फुले स्मारक समितीचे चंद्रकांत डोके, आनंदा कुदळे, काळुराम गायकवाड, संतोष जोगदंड, हनुमंत माळी, सुरेश गायकवाड, गिरीष वाघमारे, गुलाब पानपाटील, वैजनाथ शिरसाट, नंदा करे, संगिता आहेर, विलास गव्हाणे, कोंडीबा जाधव, सुखदेव खेडकर आणि बाळासाहेब भालेकर आदी उपस्थित होते.
स्मारकात भव्य वाचनालय व ग्रंथालय सुरू करावे, सांस्कृतिक हॉलचे नामकरण करावे, महिलांसाठी विविध प्रशिक्षण वर्ग चालू करावेत. सर्व विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका चालू करावी. फुले दांपत्यावर चित्रफित तयार करावी. स्मारकाच्या ठिकाणी सावित्रीबाई फुलेंचा पूर्णाकृती पुतळा उभारावा. महात्मा फुलेंच्या पुतळ्याशेजारी साहित्य ठेवण्यासाठी रुम तयार करावी. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी. स्वच्छता ठेवण्यात यावी. विद्युत रोषणाई करावी. कारंजे सुरू करावे. पुतळ्यास मेघडंबरी व हार घालण्यासाठी आरसीसी जिना तयार करावा. स्मारकाच्या ठिकाणी फुले दांपत्यावर म्युरल्स तयार करुन बसवावेत. दिशा दर्शक फलक चौकात बसवावेत. स्मारकाचा जो मुळ उद्देश आहे, त्यासाठी त्याचा वापर व्हावा. अन्य कार्यालयासाठी स्मारकाची जागा देण्यात येऊ नये, अशा मागण्या बैठकीत करण्यात आल्या.
महापौर राहुल जाधव म्हणाले की, स्मारकाची सर्व राहिलेली कामे सात दिवसात पूर्ण करावीत. त्यानंतर त्याचे हस्तांतरण भूमि जिंदगी विभागाकडे करावे. ग्रंथालयासाठी पुस्तक खरेदी सुरू करावी. स्मारकामध्ये पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, स्वच्छता ठेवावी. एमपीएससी-युपीएससीकरीता अभ्यासिका सुरू करण्यात यावी. महिला व मुलींसाठी प्रशिक्षण वर्ग सुरू करावेत, अशा सूचना त्यांनी अधिका-यांना केल्या आहेत.