सांगवीत प्राणी मित्राने दिले माकडाला जीवदान
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/1sangavi_23.jpg)
सांगवी – उष्माघाताने असह्य झालेल्या माकडाला येथील प्राणीमित्राने जीवदान दिले आहे. गेल्या आठ दिवसांपासून ऊन्हाचा पारा उच्चांक गाठत असताना मनुष्याबरोबर प्राण्यांनाही उष्णतेच्या झळा सोसाव्या लागत आहेत.
पिंपळे निलखच्या विशालनगर येथील चोंधे पाटील लॉन्स जवळ झाडावर एक माकड निपचीत पडल्याचे दिसून आले. मात्र, रविवारी दुपारी दोनच्या सुमारास ते माकड झाडावरून खाली पडले. ही माहिती सांगवीतील प्राणी मित्र विनायक बडदे यांना समजली. त्यांनी त्या माकडाला ताब्यात घेतले. त्याच्या शरीरावर कोणतीही जखम अथवा इजा दिसली नाही. परंतु ते त्याच्यात अत्यंत अशक्त दिसून येत होता.
निपचीत पडलेल्या माकडाला औंध येथील पशुवैद्यकीय दवाखान्यात नेले. तेथील पशुवैद्य अधिकारी डॉ शंकर शेटे यांच्याकडून औषधोपचार करण्यात आला. त्यानंतर बडदे यांनी माकडाला त्यांच्या घरी आणले. त्याला ते इलेक्ट्रॉल पावडर बरोबर ज्यूस व फळे खाऊ घालत असून त्याची तब्येत सुधारत आहे. आणखी पाच सहा दिवसांनी पुर्ण बरे झाल्यावर बडदे वनविभागाच्या देखरेखीखाली त्याला जंगलात सोडून देणार आहेत.
पशुवैद्य डॉ शेटे म्हणाले, “वाट चुकलेले, उपाशी, तहाणलेले व घाबरलेल्या या माकडाला ऊन्हाचा त्रास झाल्याने बराचसा अशक्तपणा आला होता. त्याला इलेक्ट्रॉल पावडर दिल्यावर थोडा तरतरीतपणा येऊन ते शुध्दीवर आले. त्याला आणखी काही दिवस आराम आणि औषधोपचाराची गरज आहे.”
झोपडी वजा पत्र्याच्या खोलीत राहणारे विनायक बडदे हे वन्यपशुपक्षी संरक्षण सामाजिक संस्था चालवित आहे. शासन अथवा इतरांकडून कोणतेही अनुदान, फी, अथवा देणगी न घेता प्राणीमात्रांची सेवा करीत आहेत. कुत्री, मांजर, मोर लांडोर, घुबड, घार, उदमांजर, वटवाघुळ यासारख्या शेकडो जखमी प्राण्यांना त्यांनी स्वतःचे रूपये खर्च करून जीवदान दिले आहे.