सरकारी योजना स्वतःच्या संस्थांच्या व वैयक्तिक नावाने सांगून नागरिकांची फसवणूक, नाना काटे यांचा भाजप नेत्यावर आरोप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/04/A-Gallery_20-1.jpg)
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
देशात कोरोना या भयंकर विषाणुने धुमाकूळ घातला आहे. एका बाजूला अनेक लोक सामाजिक दृष्टिकोनातून अनेकांना मदत करत आहेत. पिंपरी – चिंचवड शहरसुद्धा याला अपवाद नाही. परंतु , शहरातील भाजप नेत्यांकडून संकटात देखील चमकोगिरी केली जात आहे. नागरिकांसाठी उपलब्ध होणाऱ्या सरकारी योजनांची संकल्पना स्वतःच्या संस्थांच्या व वैयक्तिक नावाने सांगून नागरिकांना फसवत असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी केला आहे.
प्रसिद्धी पत्रकात काटे यांनी म्हटले आहे की, केंद्र, राज्य सरकार सर्व नागरिकांना अल्प व मोफत रेशन उपलब्ध करून देत आहे. त्यातील काही अन्नधान्य संबंधित रेशन दुकानात पोहोचले आहे. पिंपळे सौदागर येथील एका दुकानांमध्ये स्थानिक आमदारांच्या नावाने, आमदारांच्या संस्था, सामाजिक संस्थेच्या नावाने किराणामाल वाटत असल्याची पावती दिली जाते. पावती देताना संबंधित राशन मिळणाऱ्या नागरिकाच्या कुटुंबाला भाजपच्या नगरसेवकाच्या कार्यालयात बोलावून पावतीवर त्यांच्या राशन कार्ड नंबरसह नोंद करून ती पावती त्या कुटुंबाला देण्यात येते. त्यानंतर त्या कुटुंबाने राशनच्या दुकानात जाऊन ती पावती दाखवल्यानंतर आमदारांनी हे राशन दिले आहे असे भासविले जात आहे, असल्याचा आरोप काटे यांनी केला आहे.
शहरातील सर्व सरकारी अन्नधान्य राशन मिळणाऱ्या दुकानांमध्ये हा प्रकार सर्रास चालू असल्याचे समजते. हे सर्व दुकानदार स्थानिक आमदारांच्या दबावामुळे कोणीही बोलत नाहीत. राशन किरणाचे संबंधित अधिकारी सुद्धा यात सहभागी आहेत, असेही ते म्हणाले .