संभाजी बिडीचे नाव बदला, पुणे जिल्ह्यातील सर्वपक्षीय लोकप्रतिनिधींना संभाजी ब्रिगेडचे निवेदन
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
छत्रपती संभाजी महाराज हे अखंड महाराष्ट्राची अस्मिता आहेत. छत्रपती संभाजी महाराजांना त्यांच्या उभ्या आयुष्यात काडीचही व्यसन नव्हते. अशा महापुरुषांच्या नावाचा दुरुपयोग अनेक वर्षांपासून साबळे आणि वाघिरे कंपनीच्या उत्पादनाला संभाजी बिडी हे नाव देऊन करत आहे. बिडीवरील संभाजी महाराज यांचे नाव कायमचे हटविण्यात यावे. याबाबत पावसाळी अधिवेशनात लोकप्रतिनिधींनी आवाज उठवावा, असे आवाहन संभाजी ब्रिगेडचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष सतिश काळे यांनी केली आहे.
२०११ साली संभाजी ब्रिगेडने अनेक आंदोलने करून संभाजी बिडीवरील संभाजी महाराजांचा फोटो काढून टाकण्यास कंपनीला भाग पाडले. अचानक नावात बदल केल्यास व्यवसायिक अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून नावात ही हळूहळू बदल करू, असे आश्वासन कंपनीने दिले होते. परंतु, नऊ वर्षे उलटून ही संभाजी महाराज याचं नाव बिडीला देऊन तमाम शिव-शंभूप्रेमींच्या भावना दुखवण्याचं काम या कंपनीकडून होत आहे.
संभाजी ब्रिगेड पुणे जिल्ह्याच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरातील असंख्य तंबाखूजन्य पदार्थ ठोक विक्रेत्यांना भेटून संभाजी बिडी आपण विक्री करु नये, असे आवाहन केले होते. संभाजी बिडीची विक्री करणारी अनेक वाहने महाराष्ट्रातील अनेक शहरात अडवून परत पाठवण्यात आली. संभाजी बिडीवरील नाव त्वरित बदलावे म्हणून शिवधर्म फाऊंडेशन यांच्या वतीने संभाजी महाराज जन्मभूमी पुरंदर येथे ४ सप्टेंबर पासून उपोषण सुद्धा चालू आहे.
महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यातील अनेक सामाजिक संघटना या मागणीसाठी आग्रही आहेत. या सर्वांच्या पाठीशी संभाजी ब्रिगेड ठामपणे उभी आहे. छत्रपती संभाजी महाराज यांचा जन्म आणि मृत्यू सुद्धा पुणे जिल्ह्यात झालेला आणि म्हणून पुणे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी या नात्याने सर्व आमदारांनी विधानसभेत येत्या पावसाळी अधिवेशनात प्रश्न उपस्थित करून सकारत्मक निर्णय घ्यावा, अशी विनंती पुणे जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधींना संभाजी ब्रिगेडने केली आहे.
या निवेदनावर पुणे जिल्हा अध्यक्ष विशाल तुळवे, उपाध्यक्ष सतिश काळे, जिल्हा कार्याध्यक्ष गणेश दहिभाते, प्रमोद गोतारणे, सचिव विशाल जरे, संघटक ज्ञानेश्वर लोभे यांच्या सह्या आहेत.