breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे
संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळा, पक्षप्रमुख उध्दव ठाकरे उपस्थितीत राहणार
– खासदार श्रीरंग बारणे यांची माहिती
पिंपरी ( महा ई न्यूज ) – संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती खासदार श्रीरंग बारणे यांनी दिली.
देहू येथील संत तुकाराम महाराज देवस्थानकडून मागील काही वर्षांपासून उद्धव ठाकरे यांना पालखी प्रस्थान सोहळ्यास येण्याचे निमंत्रण देण्यात येत आहे. त्यानूसार यंदाच्या पालखी सोहळ्यास उपस्थित राहण्याचे निमंत्रण स्विकारले आहे.
आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखी देहूतून सोमवारी (दि. 24 जून) प्रस्थान ठेवणार आहे. देहू गावातील देऊळवाड्यातून पालखी प्रस्थान ठेवणार आहे. या पालखी सोहळ्यासाठी महाराष्ट्र राज्यासह देशभरातून वैष्णवांचा मेळा देहूगावकडे येतो. अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या विठ्ठलाच्या भेटीसाठी देहूतून संत तुकाराम महाराज पालखीचे प्रस्थान होते.
संत तुकाराम महाराज देवस्थानच्या वतीने मागील काही वर्षांपासून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना पालखी प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात येत होते. मात्र, ठाकरे यांच्या कार्यव्यस्ततेमुळे ते प्रस्थान सोहळ्यासाठी उपस्थित राहू शकले नाहीत. यंदा खासदार श्रीरंग बारणे यांनी पालखी प्रस्थान सोहळ्याला उद्धव ठाकरे यांनी उपस्थित राहावे, याकरिता प्रयत्न केले. त्यानूसार ठाकरे पालखी सोहळ्यास उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती खासदार बारणे यांनी दिली.