शैक्षणिक वर्षअखेरीस शिक्षण विभागाला सुचले ‘शहाणपन’
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – आर्थिक तरतुदी अभावी रखडलेल्या शालेय विद्यार्थी बुट (काळे व पांढरे) वाटपासाठी 2018-19 मधील ‘बालवाडी तफ्तरे’ या लेखाशिर्षावरील 28 लाख रुपये वर्गीकरणाचा विषय शिक्षण समितीच्या मंजुरीनंतर स्थायीच्या मंजुरीसाठी ऐनवेळी ठेवण्यात आला आहे. चालू शैक्षणिक वर्ष संपत आले असताना आर्थिक वर्गीकरणाचा खटाटोप शिक्षण विभागाने सुरू केला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना दर शैक्षणिक वर्षात शालेय बुट आणि सॉक्स दिले जातात. 2018-19 या शैक्षणिक वर्षात पुरेशी आर्थिक तरतूद उपलब्ध नसल्यामुळे बुट वाटपाचा विषय रखडला होता. आता वर्षअखेरीस शिक्षण विभागाला बुट वाटपाचे शहाणपण सूचले आहे. बुट वाटपासाठी बालवाडी दफ्तरे या लेखाशिर्षावरील 28 लाख रुपये वर्गीकरण करण्याची शक्कल सरतेशेवटी शिक्षण विभागाच्या प्रशासन अधिकारी जोत्स्ना शिंदे यांनी लढविली आहे.
अंदाजपत्रकातील बालवाडी दफ्तरे या लेखाशिर्षावरील रक्कम खर्ची पडणार नाही, असा कयास बांधून प्रशासनाने 28 लाखाच्या वर्गीकरणाचा विषय समोर आणला आहे. त्याला शिक्षण समितीने मान्यता दिली आहे. आता स्थायीच्या मान्यतेसाठी हा विषय ऐनवेळी ठेवण्यात आला आहे. मात्र, मंगळवारी (दि. 15) स्थायी समितीची बैठक झाली नसल्यामुळे पुढील सभेत या विषयावर चर्चा होणार आहे.