शिवसेना गटनेत्याच्या ‘पार्थ’ भेटीवर खासदारांचे ‘नो कॉमेंट्स’
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे आणि मावळ लोकसभा मतदार संघाचे राष्ट्रवादीचे संभाव्य उमेदवार पार्थ पवार यांच्या भेटीने शहरात राजकीय ‘कलह’ झाला आहे. या भेटीने शिवसेनेच्या प्रतिमेचा देखील प्रश्न निर्माण झाला असून याबाबत खासदार श्रीरंगअप्पा बारणे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी ‘नो कॉमेंट्स’ असे प्रत्युत्तर देऊन बोलण्यास नकार दिला.
मावळ मतदार संघाचे शिवसेना खासदार श्रीरंगअप्पा बारणे यांनी पाच वर्षाच्या कार्यकाळात केलेल्या विकास कामांची माहिती पुस्तिका देऊन पत्रकारांशी संवाद साधण्यासाठी महापालिकेत गुरूवारी (दि. 10) पत्रकार परिषद घेतली. यावेळी मावळ मतदार संघातून राष्ट्रवादीचे पार्थ पवार त्यांचे प्रतिस्पर्धक असल्याबाबत त्यांचे मत जाणून घेण्यासाठी पत्रकारांनी प्रश्न विचारले. त्यावर खासदार बारणे यांनी पार्थ पवार, अजित पवार यांच्यावर मार्मिक टिका केली. अप्पांनी राष्ट्रवादीवर संताप व्यक्त केला असताना सेनेचे गटनेते राहूल कलाटे यांनी त्याच दिवशी निगडीतील आयोजित कार्यक्रमात पार्थ पवार यांची भेट घेतली. या भेटीबाबत शिवसैनिकांमध्ये उलटसूलट चर्चा सुरू आहे. शिवसेनेचे शहराचे नेते म्हणून खासदार बारणे यांच्याशी संपर्क साधून याबाबत विचारणा केली असता त्यांनी बोलण्यास नकार दिला. शिवसैनिकांनी याचा अर्थ काय काढायचा, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
कलाटे आणि पार्थ यांच्या भेटीने शहराच्या राजकीय वर्तुळात तर्क वितर्क लढविले जात आहेत. आगामी विधानसभा निवडणूक जवळ आल्याने या भेटीचा अर्थ पक्षांतरापर्यंत काढला जात आहे. कलाटे राष्ट्रवादीत तर जाणार नाहीत ना, असा प्रश्न शिवसैनिकांना पडला आहे.