शिरुरमध्ये पंधरा वर्ष नुसत्या ‘थापां’ना जन्म दिला; पण ‘विकास’ काय जन्माला आला नाय?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/03/FB_IMG_1551283598015.jpg)
- व्यंगचित्रातून राष्ट्रवादीचा शिवसेना खासदार आढळराव पाटलांवर निशाणा
पिंपरी ( महा ई न्यूज ) – शिरुरचे शिवसेना खासदार शिवाजी आढळराव पाटील यांच्यावर राष्ट्रवादी काॅंग्रेसने व्यंगचित्राच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. नको बाबा.. पंधरा वर्ष नुसत्या ‘थापा’ना जन्म दिला, पण ‘विकास’ काय जन्माला आला नाय? असा सवाल उपस्थित करुन पुन्हा लोकसभा निवडणूक 2019 मध्ये शिरुरमधून खासदारकीच्या अपेक्षा ठेवून आहात, या आशयाचे व्यंगचित्र सोशल मीडियातून प्रचंड व्हायरल होत असून त्यावर शिरुर लोकसभेतील मतदारात एकच चर्चा सुरु आहे.
आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिरुर लोकसभेवर राष्ट्रवादी काॅंग्रेसने लक्ष केंद्रीत केले आहे. शिरुर लोकसभा मतदार संघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. याच मतदार संघातून शिवाजी आढळराव पाटील हे सलग पंधरा वर्षे लोकसभेचे प्रतिनिधीत्व करीत आहेत. परंतू, मागील पंधरा वर्षांत शिरुर लोकसभा मतदार संघातील जनता खासदारांवर नाराज असल्याचे दिसत आहे. विशेषता बैलगाडा शर्यतीवरील बंदी अद्याप उठलेली नाही. पुणे-नाशिक महामार्गाचे चाैपदरीकरण अद्याप रखडलेल्याने वाहतूक कोंडीचा नागरिकांना त्रास होतोय, खेड-राजगूरुनगरचे विमानतळ प्रकल्प हा राजकीय कुरघोडीमूळे पुरंदरला हलविला गेला, हे खासदारांचे मोठे अपयश आहे. याशिवाय संरक्षण हद्दीतील रेडझोन, बफरझोन प्रश्न अद्याप रेंगाळलेला असल्याचा आरोप राष्ट्रवादी काॅंग्रेसकडून होवू लागला आहे.
दरम्यान, शिरुर लोकसभा मतदार संघातील विविध प्रश्नावर राष्ट्रवादी काॅंग्रेसने होर्डिंग्जच्या माध्यमातून प्रश्न उपस्थित करुन खासदार शिवाजी आढळराव पाटील यांना सवाल उपस्थित केले आहेत. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादी काॅंग्रेसमध्ये चांगलीच रंगत पाहावयास मिळणार आहे.