शास्तीबाबत मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या पंधरा दिवसांचे काऊंटडाऊन आजपासून सुरू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/IMG-20190112-WA0093-1.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शहरातील अनधिकृत बांधकामांची शास्ती येत्या पंधरा दिवसात माफ करु…! असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. 9) दिले. या पंधरा दिवसांचे काऊंटडाऊन राष्ट्रवादी, शिवसेना, मनसेच्या पदाधिका-यांनी आजपासून सुरू केले आहे. त्यासाठी आज शनिवारी (दि. 12) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या समोर मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनाचा फ्लेक्स लावून घोषणा देण्यात आल्या.
या आंदोलनात राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते दत्ता साने, शिवसेना गटनेते राहूल कलाटे, मनसे गटनेते सचिन चिखले, युवक अध्यक्ष विशाल वाकडकर, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे, महिला अध्यक्षा वैशाली काळभोर, नेते नाना काटे, मयूर कलाटे, प्रशांत शितोळे, गोरक्ष लोखंडे, अपक्ष नगरसेवक नवनाथ जगताप, नागरी हक्क सुरक्षा समितीचे अध्यक्ष मानव कांबळे, माजी नगरसेवक मारुती भापकर आदी आंदोलनात सहभागी झाले होते.
मुख्यमंत्र्यांनी शास्तीकर माफीचे आश्वासन दिले असतानाही महापालिकेकडून नागरिकांना जप्तीपूर्वीच्या नोटीसा दिल्या जात आहेत. त्यामुळे महापालिकेने त्वरित नागरिकांना जप्तीच्या नोटीसा देणे थांबवावे. अशी मागणी विरोधकांनी केली आहे. ”मुख्यमंत्र्यांनी चिंचवड येथील एका सभेत शास्तीबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार त्या-त्या महापालिकांना देण्यात येईल, असेही पाठीमागे एका सभेत जाहीर सांगितले होते. मात्र, त्यावर अद्याप काहीही झाले नाही. आता पुन्हा मुख्यमंत्र्यांनी शास्तीकराबाबत 15 दिवसात निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे. त्याचे काऊंटडाऊन विरोधकांनी आजपासून सुरू केले आहे.