शहरात आठ दिवसात १ हजार नवीन कोरोना रुग्णांची नोंद
![Maharashtra has the most active patients in the country](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/korona.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरात पुन्हा कोरोनाचा धोका वाढताना दिसून येत आहे. मागील आठ दिवसात शहरात एक हजार 28 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. सक्रिय रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त केली जात आहे. दुस-या लाटेची हलकी सुरवात असल्याची भीती वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे. दरम्यान, नागरिकांचे बेफिकीरीचे प्रमाण वाढले आहे. नागरिकांना अधिक दक्षता घेण्याचे आवाहन केले जात आहे.
मागीलवर्षी राज्यातील कोरोनाचा पहिला रुग्ण पिंपरी-चिंचवड शहरात आढळला होता. 10 मार्च रोजी एकाचदिवशी तीन रुग्ण सापडले होते. त्यानंतर शहरातील रुग्णसंख्येत प्रचंड वेगाने वाढ झाली. शहरात कोरोनाने हाहा:कार माजविला होता.
दिवाळीनंतर शहरातील रुग्णसंख्येत घट होत होती. 100 च्या आतमध्ये रुग्णसंख्या आली होती. परंतु, आता पुन्हा 2021 मध्ये शहरात कोरोनाचा धोका वाढताना दिसून येत आहे. मागील आठ दिवसात शहरात एक हजार 28 नवीन रुग्णांची वाढ झाली आहे. दिवसाला 100 नवीन रुग्णांची नोंद होत आहे. त्यामुळे सक्रिय रुग्णांचे प्रमाण वाढताना दिसून येत आहे. नागरिकांमध्ये बेफिकीरी वाढली असून गर्दी मोठ्या प्रमाणात केली जात आहे. सार्वजनिक कार्यक्रमात नियमांचे पालन होताना दिसून येत नाही.
अनेक नागरिक मास्कविना फिरत आहेत. सुरक्षित अंतराचे पालन होत नाही. रुग्णसंख्या वाढल्याने कठोर निर्णय घेण्याचे संकेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून दिले जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याची मोठी आवश्यकता आहे.