शहरातील 8 ‘एटीएम’ मशिन फोडणारी सराईत टोळी जेरबंद, हरियाणात सापळा लावून केली अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/02/ATM-cutting-theft-arrested.jpg)
- वाकड पोलिसांच्या पथकाची यशस्वी कामगिरी
- पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडून कौतुक
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
एटीएम मशीन फोडून पैसे चोरणा-या टोळीला अटक करण्यात वाकड पोलिसांना यश आले आहे. वाकड पोलिसांनी थेरगावमधील तिघांना आणि हरियाणामधील तिघांना अटक केली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांनी आज गुरूवारी (दि. 27) पत्रकार परिषदेत सांगितली.
झरुद्दीन ताहीर हुसेन (वय 29), सरफुद्दीन हसीम (वय 22), मोहमद शकिर हसन (वय 35) यांना हरियाणामधून अटक केली. तर, संदीप माणिक साळवे (वय 43), दत्तात्रय रघुनाथ कोकाटे (वय 42), गौतम किसन जाधव (वय 38) या तिघांना थेरगाव येथून अटक केली आहे.
पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई म्हणाले की, 27 जानेवारी रोजी थेरगाव येथे अॅक्सीस बँकेचे तर 12 फेब्रुवारी रोजी रहाटणी येथे आरबीएल बँकेचे एटीएम फोडले. एकाच परिसरात 15 दिवसात दोन एटीएम फोडल्याने हे प्रकरण गांभिर्याने घेतले. वाकड पोलिसांनी चोरट्यांचा तपास करण्यासाठी चार पथके तयार केली. एटीएम सेंटरच्या परिसरातील लॉज, शहरात येणारे-जाणारे मार्ग, टोल नाके येथील सीसीटीव्ही तपासण्यात आले. तपासादरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांना माहिती मिळाली की, काहीजण कारमधून तोंडाला बांधून येऊन एटीएम सेंटरमधील सीसीटीव्ही कॅमेरे फोडून गॅस कटरच्या साहाय्याने एटीएम कापून रोकड चोरायचे.
सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने म्हणाले की, वाकड येथे दाखल एटीएम फोडीच्या गुन्ह्यातील दोघेजण थेरगाव फाटा येथे येणार असल्याचे समजताच सापळा रचून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. मात्र, यातील मुख्य सुत्रधार हरियाणात असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी दिल्ली मार्गे हरियाणा येथे जाऊन अटक केली. त्यातील एकाला दिल्ली आंतरराष्ट्रीय विमानतळावर तर अन्य दोघांना त्यांच्या गावापासून काही अंतरावर बोलावून सापळा रचून अटक केली.
अझरुद्दीन, सर्फुद्दीन, संदीप आणि दत्तात्रय या चौघांनी गणेशनगर थेरगाव येथे अॅक्सीस बँकेचे एटीएम फोडले. तर मोहमद आणि गौतम यांनी रहाटणी येथील आरबीएल बँकेचे एटीएम फोडले. सर्व आरोपींकडून तीन लाख रुपये रोख रक्कम, तीन कार, एक दुचाकी, गॅस सिलेंडर, गॅसगन कटर, एटीएममधील रिकामे कॅसेटस, 16 एटीएम डेबिट कार्ड असा 20 लाख 20 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या आरोपींचे आणखी सहा साथीदार फरार आहेत. पोलीस त्यांच्या मागावर आहेत, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पथकातील जहाँबाज पोलीस कर्मचारी
ही कारवाई पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई, अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त विनायक ढाकणे, सहाय्यक पोलीस आयुक्त श्रीकांत मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर, सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने, उपनिरीक्षक सिद्धनाथ बाबर, पोलीस कर्मचारी बापूसाहेब धुमाळ, नितीन ढोरजे, बिभीषण कन्हेरकर, जावेद पठाण, प्रमोद भांडवलकर, रमेश गायकवाड, सुरेश भोसले, विक्रम जगदाळे, प्रमोद कदम, विक्रम कुदळ, विजय गंभीरे, दीपक भोसले, सचिन नरुटे, शाम बाबा, नितीन गेंगजे, प्रशांत गिलबिले, तात्यासाहेब शिंदे, सुरज सुतार, नूतन कोंडे यांच्या पथकाने केली आहे.
आरोपींनी शहरातील आठ एटीएम मशिन फोडले
अटक केलेल्या सहा जणांनी पिंपरी-चिंचवड शहरात आठ ठिकाणी एटीएम फोडले आहेत. या कारवाईमुळे वाकड पोलीस ठाण्यातील तीन, सांगवी पोलीस ठाण्यातील दोन, भोसरी, दिघी आणि चिखली पोलीस ठाण्यातील प्रत्येकी एक असे एकूण आठ गुन्हे उघडकीस आले आहेत. आरोपी सर्फुद्दीन हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर सेक्टर पाच, गुरगाव पोलीस ठाण्यात वाहन चोरीचा तर सोहना गुरगाव, सेक्टर 56 गुरुग्राम पोलीस ठाण्यात सात फसवणुकीचे व चोरीचे गुन्हे दाखल आहेत.
वाकड पोलिसांच्या पथकाला 50 हजारांचे इनाम
वाकडच्या टीमच्या प्रशंसनीय कामगिरीबद्दल त्यांना पोलीस आयुक्तांकडून 50 हजार रुपये बक्षिस दिले जाणार आहे. तसेच, ज्या बॅंका आपल्या एटीएम मशिनबाहेर सुरक्षारक्षक ठेवत नाहीत. ज्या बॅंकांची सुरक्षा धोक्यात आहे. अशा बॅंकांमध्ये नागरिकांनी पैसे ठेवून नयेत, असे आवाहन पोलीस आयुक्त बिष्णोई यांनी केले आहे.