शहरातील विविध विकास कामांसाठी 17 कोटीच्या खर्चास स्थायीची मंजुरी
- सभापती विलास मडेगिरी यांची माहिती
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी चिंचवड शहरातील विविध विकास कामासाठी सुमारे १७ कोटी १७ लाख रूपयांच्या खर्चास आज (बुधवारी) स्थायी समिती सभेत मान्यता दिली. या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती विलास मडेगिरी होते.
मडेगिरी म्हणाले की, महापालिकेच्या प्रभाग क्रमांक ४ मधील बोपखेल परिसरात नविन शौचालय बांधण्यास सुमारे ४१ लाख
५४ हजार खर्चास मान्यता देण्यात आली. पिंपळे गुरवच्या राजमाता जिजाऊ उद्यानात संगीत कारंजे बसविणे, विद्युत विषयक कामे करण्यास येणा-या सुमारे ४ कोटी १४ लाख खर्चास बैठकीत मान्यता देण्यात आली.
तसेच विविध उद्यानात पाणीपुरवठा करणेकामी जुन्या बोअरवेल दुरूस्त करणे, नविन बोअरवेल घेणेबाबत सुमारे १४ लाख ९९ हजार रूपये
खर्चास मान्यता देण्यात आली. महापालिकेचे सर्व दवाखाने, रूग्णालये यांना तातडीने आवश्यक औषधे, साहित्य उपलब्ध होणे, त्या येणा-या सुमारे ५० लाख रूपयांच्या खर्चास मान्यता देण्यात आली.
प्रभाग क्रमांक २३ मधील स्मशान भूमी आणि घाटाचे नुतनीकरण करण्यात येणार आहे. त्या कामास सुमारे १ कोटी ६६ लाख २२ हजार रूपये खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. यशवंतराव चव्हाण स्मृती रूग्णालयाच्या पदव्युत्तर संस्थेसाठी औषध,वैद्यकशास्त्र व शल्य चिकित्सा या विषयाची एकूण ४५१ पुस्तके खरेदी करण्यासाठी येणाऱ्या सुमारे १४ लाख ९९ हजार रूपये खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली.
महापौर चषक राज्यस्तर रोलबॉल स्पर्धा २०१९-२० आयोजित करण्यात येणार आहे. त्या कामास सुमारे ६ लाख ९७ हजार रूपयाच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली. मनपाच्या क्रिडा,कला,साहित्य व सांस्कृतिक धोरणानुसार नम्रता सुनिल तायडे हीची जॉर्डन येथे होणा-या तायक्योंदो स्पर्धेत निवड झाली आहे. तर जीवन मुरलीधर लांडगे आणि राजेश सुरेश इरले याची हर्बील चायना येथे होणा-या एशियन बॉडी बिल्डींग स्पर्धेत निवड झाली आहे. त्यांना प्रत्येकी एक लाख रुपये प्रमाणे आर्थिक सहाय्य करण्यास मान्यता देण्यात आली.
महापौर चषक राज्यस्तर कॅरम स्पर्धा २०१९-२० (पुरूष, महिला, गट व जेष्ठ नागरिक गट) आयोजित केले. त्या खर्चास येणा-या सुमारे ४ लाख ९९ हजार रूपयाच्या खर्चास या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.