शहरातील बोअरवेल नियमावलीची चौकशी करण्याचे आदेश
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिचंवड शहरातून पिंपरी ते दापोडी महामेट्रो कंपनीकडून मेट्रोचे काम जोरात सुरू आहे. मात्र, महामेट्रो कंपनी बेकायदा बोअरवेल खोदून ते पाणी वापरत असल्याचा आक्षेप महापालिका स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. स्थायी समितीने महापालिका प्रशासनाना मेट्रोचा पाणी वापर, तसेच शहरातील बोअरवेलसाठीची नियमावलीबाबत चौकशी करण्य़ाचे आदेश दिले आहेत.
ममता गायकवाड स्थायी समिती बैठकीच्या अध्यक्षस्थानी होत्या. मेट्रोकडून पिंपरी ते दापोडी पिलर उभारण्याचे काम सुरू आहे. तर, पिलर उभे राहताच त्यावर स्पॅन बसवून मेट्रो उड्डाणपूल उभा केला जात आहे. पिलर व्यतिरिक्त इतर साहित्य बनविण्याचे काम महामेट्रोच्या ठेकेदाराकडून पिंपळे गुरव येथील जागेत सुरू आहे. मेट्रोकडून मोठ्या प्रमाणात सिमेंट व क्रॉक्रीटीकरणाचे काम होत आहे. त्यासाठी प्रचंड पाणी वापर होत आहे. मात्र, महामेट्रो कंपनीकडून बांधकामासाठी कोणत्या पाण्याचा वापर केला जात आहे, असा प्रश्न स्थायी सदस्यांनी उपस्थित केला होता.
स्थायी समितीने महापालिका प्रशासनाकडे या पाणी वापराबाबत विचारणा केली. त्यावर अधिका-यांनी महामेट्रो बोअरवेलचे पाणी बांधकामासाठी वापरत असल्याचे सांगितले. मात्र, हे बोअरवेल बेकायदा खोदलेले असून हा पाणी वापर देखील बेकायदा असल्याचा आक्षेप सदस्यांनी घेतला आहे. स्थायी समितीने मेट्रोच्या पाणी वापराबाबत सविस्तर चौकशी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. त्याचबरोबर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील यांना बोअरवेल खोदाईबाबतची नियमावलीची माहिती घेण्याच्या सूचना स्थायी समितीने केल्या आहेत. बोअरवेलच्या माध्यमातून नियमानुसार महापालिकेचे उत्पन्न वाढविण्याचा पर्याय देखील शोधला जाऊ शकतो, असे स्थायी सदस्य विलास मडेगिरी यांनी म्हटले आहे.