शहरातील अनधिकृत नळजोड धारकांवर आजपासून कारवाईचे धाडसत्र
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापलिकेने केलेल्या अनधिकृत नळजोडाच्या सर्व्हेक्षणानुसार शहरात एकूण 12 हजार 842 अनधिकृत नळजोड निदर्शनास आले आहेत. त्यातील केवळ 4 हजार 419 नळजोड धारकांनी आपले अनधिकृत जोड अधिकृत करून घेण्यासाठी अर्ज नेले होते. त्यातील 3 हजार 960 लोकांनी अर्ज जमा केले असून उर्वरीत लोकांचे अर्ज पालिकेला प्राप्त झाले नाहीत. यासह उर्वरीत सर्वच अनधिकृत नळजोड धारकांना ते कनेक्शन अधिकृत करण्यासाठी यापुढे कसलिही संधी मिळणार नसून त्यांच्यावर आता पाणी पुरवठा विभागाकडून थेट कारवाई होणार आहेत. या कारवाईला आजपासून सुरूवात झाली आहे.
पिंपरी-चिंचवड शहराने ऐन पावसाळ्यात देखील पाणी टंचाईच्या झळा सोसल्या आहेत. या टंचाईची कारणे शोधण्यात पालिकेचा पाणी पुरवठा विभाग अपयशी ठरला. आपल्यावरील टांगती तलवार दूर करण्यासाठी या विभागाने शहरातील अनधिकृत नळ कनेक्शनची शोधाशोध सुरू केली. त्यासाठी सर्व्हेक्षण पध्दती राबवून शहरातील अनधिकृत नळजोडांची संख्या जाहीर केली. त्यानुसार पालिकेच्या अ, ब, क, ड, ई, फ, ग, ह यातील दोन क्षेत्रीय कार्यालये सोडली. तर, इतर सहा क्षेत्रीय कार्यक्षेत्रात एकूण 12 हजार 842 अनधिकृत नळजोडांची संख्या समोर आली. हे जोड अधिकृत करून घेण्यासाठी 31 ऑक्टोबरपर्यंत अर्ज करण्याचे आवाहन केले होते. तत्पुर्वी, एकवेळ मुदतवाढही देण्यात आली होती.
त्यावर 4 हजार 419 अर्जांचे वितरण झाले होते. त्यातील 3 हजार 960 अर्ज पालिकेला जमा झाले. 2 हजार 809 एवढी प्रकरणे मंजुरही झाली. तर, प्राप्त अर्जांपैकी नामंजूर झालेली प्रकरणे 53 राहिली. अर्ज नेलेल्यांची 1 हजार 98 प्रकरणे शिल्लक आहेत. यासह अर्ज न केलेल्या अशा एकूण 10 हजार 33 नळजोड अनधिकृत आहेत. त्यांना यापुढे आता अधिकृत करण्यासाठी कसलिही संधी मिळणार नाही. आता त्यांच्यावर थेट कारवाई केली जाणार आहे. या कारवाईला आजपासून सुरूवात झाली आहे.