Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
वैद्यकीयमध्ये डाॅ. पवन साळवेंना बढती तर डाॅ. अनिल राॅय यांची गच्छंती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/07c270c709558754d5d8f8e1a1bf9423_XL.jpg)
आयुक्त श्रावण हर्डीकर यांचा दणका
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. के. अनिल राॅय यांचे पंख छाटण्यास आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी सुरुवात केली आहे. त्यानूसार यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाचे विभाग प्रमुखपद अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांना देण्यात आले आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी आदेश काढून डॉ. रॉय यांना चांगलाच दणका दिला आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी पदाचा वाद विकोपाला पोहोचला आहे. महापालिकेच्या आरोग्य वैद्यकीय अधिकारी पद हे डाॅ. अनिल राॅय यांच्याकडून काढून अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डाॅ. पवन साळवे यांना पदोन्नती देण्यास महासभेने मान्यता दिली आहे. परंतू, आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांनी पदाचा वाद उच्च न्यायालयात घेवून गेल्याने परस्थिती जैसे थे राहिली आहे. न्यायालयात हे प्रकरण मार्गी लागण्यापूर्वीच डॉ. रॉय आणखी वादात अडकले आहेत. त्यांच्यावर पोलिसात अॅट्रॉसिटी कायद्याअंतर्गंत व फसवणूकीचा गुन्हा दाखल झाला आहे. हा सगळा वाद डॉ. रॉय यांच्या भोवती फिरत असताना आयुक्त हर्डीकर यांनी आदेशामुळे त्यांना आणखी एक धक्का मिळाला आहे.
डॉ. अनिल रॉय यांच्याकडून वायसीएम रुग्णालयाचे विभाग प्रमुखपद काढून घेण्यात आले आहे. ते विभाग प्रमुख पद आता डॉ. साळवे यांना देण्यात आले आहे. रुग्णालय अधीक्षक म्हणून डॉ. मनोज देशमुख वायसीएमचे कामकाज बघत होते. मात्र, त्यांच्यावर विभागप्रमुख म्हणून डॉ. रॉय यांचे नियंत्रण होते. आता डॉ. साळवे यांच्याकडे वायसीएमचा सगळा कारभार सोपविण्यात आला आहे. तसा आदेश आयुक्त हर्डीकर यांनी गुरुवारी (दि.10) काढला असून कामकाजाच्या सोयीसाठी हा निर्णय घेण्यात येत असल्याचे त्यात म्हटले आहे.