विमानाने प्रवास करत ‘हायप्रोफाईल’ चोरट्याला पुण्यात अटक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/08/crime-1-1.jpg)
12 अलिशान मोटारी, सव्वा दोन कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त
पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी
पंजाब, हरियाणा येथून अलिशान मोटारींची चोरी करून त्याची विक्री करण्यासाठी पुण्यातील गॅरेजमध्ये ठेवायची. त्यानंतर पुन्हा दुसरी मोटार चोरण्यासाठी विमानाने पंजाब, हरियाणाला जाणाऱ्या ‘हायप्रोफाईल’ चोरट्याला गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने जेरबंद केले आहे. त्याच्याकडून 12 अलिशान मोटारी व 15 मोटारींचे इंजिन असा एकूण सव्वा दोन कोटींचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
चनप्रित हरविंदरपाल सिंह (वय 43, रा. एस.बी. पाटील रोड, रावेत) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. रावेतमधील गणेशनगर येथील एका गॅरेजमध्ये चोरीची दोन वाहने उभी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांना गॅरेजवर छापा टाकून चनप्रित याला ताब्यात घेतले. याठिकाणी मिळालेल्या इनोव्हा मोटारीवर महाराष्ट्र पासिंगचा नंबर होता, मात्र त्याच्या इंजिन नंबरवरून खात्री केली असता ही मोटार पंजाब राज्यातील असल्याची निष्पन्न झाले. यासह येथील स्विफ्ट मोटारीवरील नंबरही खोटा असल्याचे समोर आले. यावरून चनप्रित याने ही वाहने चोरून त्यांच्या चेसीस व इंजिन नंबरमध्ये फेरफार केल्याचे उघड झाले. या गुन्ह्यात चनप्रित याला अटक करून 13 दिवसांची कोठडी घेण्यात आली.
चनप्रित व त्याचा साथीदार या दोघांच्या भागिदारीत रावेत येथे गॅरेज असून ते इंन्शुरंस कंपनीनकडून अपघातात नुकसान झालेल्या मोटारी कागदपत्रांसह विकत घेवून विकत घेतलेल्या मोटारीच्या मॉडेलची व रंगाची मोटार पंजाब, हरियाणा, दिल्ली व इतर राज्यातून चोरायचे. त्या मोटारीवर अपघातातील मोटारीचा चेसीस नंबर असलेला भाग लावून मोटारीची पुन्हा विक्री करीत असल्याचे तपासात निष्पन्न झाले.
आरोपी चोरीच्या मोटारींना अपघात झालेल्या मोटारींचा चेसीस नंबर लावून ती मोटार दहा ते बारा लाख रूपयांपर्यंत विकत होते. विक्री केलेल्या चार इनोव्हा, दोन वेरना तसेच फॉर्च्युनर, मारूती स्विफ्ट, मारूती इर्टिगा, मारूती आल्टो, फोक्सवॅगन पोलो, मारूती रिट्स प्रत्येकी एक अशाप्रकारे बारा अलिशान मोटार जप्त केल्या आहेत. यासह रावेत व कोंढवा येथील गोडाऊनमधून इन्शुरंस कंपनीकडून अपघातात नुकसान झालेल्या मोटारींचे 13 इंजिन यासह पंजाब व दिल्ली येथून चोरीस गेलेल्या मोटारींचे दोन इंजिन असा एकून दोन कोटी 19 लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे. या मोटारी पुणे शहर, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबई. नागपूर, गोवा, सातारा, अहमदनगर, आळेफाटा या भागातून जप्त केल्या आहेत.