डांगे चौकात विदयुत डीपीला आग लागून एकाचा मृत्यू
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/01/IMG-20190113-WA0020.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या सांगवी फाटा ते रावेत बीआरटी रस्त्यातील महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण बोर्डाच्या डीपीला आग लागल्याने एका तरुणाचा आज रविवारी (दि. 13) जागीच मृत्यू झाला. त्यामुळे विदयुत विभागाचा गलथान कारभार पुन्हा चव्हाट्यावर आला आहे.
सांगवी फाटा ते रावेत बीआरटी मार्गात काही ठिकाणी विदयुत विभागाचे डीपी बोर्ड आहेत. या बोर्डचे दरवाजे अनेकदा उघडे राहिले आहेत. त्यामुळे बीआरटीमधून जाणा-या बसला अडथळे निर्माण झाले आहेत. मध्यरात्री दुचाकीस्वार अथवा खासगी वाहनचालक अपघाताला सामोरे गेले आहेत. तर, भरदिवसा पीएमपीएमलच्या बसचालकाने बस थांबवून या डीपी बॉक्सचे दरवाजे स्वतः बंद केले आहेत. याबाबत स्थानिक नगरसेवक तसेच सुज्ञ नागरिकांनी विद्युत विभागाला तक्रारी केल्या आहेत. मात्र, याकडे विद्युत प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.
आज डांगे चौकातील बीआरटी मार्गातील एका डीपी बॉक्सला आग लागली. त्यात एका नागरिकाचा होरपळून मृत्यू झाला. उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असता त्याचा मृत्यू झालेचे घोषीत करण्यात आले.