वाहतूक शाखेने बोलावलेल्या बैठकीवर रिक्षाचालकांचा बहिष्कार
![Autorickshaw drivers boycott meeting called by transport branch](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/12/20201229_125530-scaled.jpg)
पिंपरी । प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड शहर वाहतूक शाखेच्या वतीने चिंचवड येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. पिंपरी-चिंचवड शहरात रिक्षा चालकांच्या प्रश्नावर हि बैठक आयोजित केली होती. त्यासाठी रिक्षा चालक, संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते. मात्र अधिकाऱ्यांनी बैठकीस विलंब लावल्याने रिक्षा चालकांनी बैठकीवर बहिष्कार टाकला. या वेळी प्रशासनाच्या गलथान कारभारा विरोधात घोषणा देण्यात आल्या.
पिंपरी-चिंचवड शहरात रिक्षा चालकांच्या प्रश्नावर वाहतूक शाखेने बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व रिक्षा संघटनांचे पदाधिकारी आणि रिक्षा चालक उपस्थित होते. सकाळी ११ वाजता हि बैठक आयोजित केली होती. मात्र प्रत्यक्षात साडे बारा वाजले तरीही बैठक सुरु झाली नाही. रिक्षा चालक ताटकळत थांबले होते. रिक्षा व्यवसाय बुडवून आम्हाला बोलावले आणि आम्हाला ताटकळत थांबावे लागल्याने रिक्षा चालक संताप व्यक्त करत होते. दीड तास थांबून देखील मीटिंग सुरू होत नाही, यामुळे संतप्त झालेल्या सर्व रिक्षा चालक, मालकांनी आणि रिक्षा संघटना पदाधिकारी यांनी या संघटनेचा निषेध व्यक्त केला. प्रशासनाच्या विरोधात घोषणा देऊन बैठकीवर बहिष्कार टाकला. या बरोबरच घोषणा देत सर्व रिक्षा चालक-मालक बैठकीतून निघून आले.
महाराष्ट्र रिक्षा पंचायत अध्यक्ष कष्टकऱ्यांचे नेते बाबा कांबळे, रिपब्लिकन वाहतूक आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अजिज शेख, रिक्षा पंचायतचे अशोक मिर्गे, आत्माराम नाणेकर, रिक्षा महासंघाचे बाबा चव्हाण, राम बनसोडे, विष्णू लोंढे, फिरोज पाटील आदी या वेळी उपस्थित होते.