वादग्रस्त भोसरी रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याच्या हालचाली
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – भोसरी रुग्णालय खासगीकरणाचा वादग्रस्त मुद्या पिंपरी-चिंचवड शहरातील नागरिकांच्या रोषाचा केंद्रबिंदू ठरत असताना महापालिकेच्या अतिरिक्त आरोग्य वद्यकीय अधिका-यांनी या रुग्णालयात बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. त्याअनुषंगाने आज भोसरी रुग्णालयाची पाहणी करून उर्वरीत कामे तातडीने मार्गी लावण्याचे आदेश त्यांनी संबंधित विभागांना दिले आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने भोसरी येथे 100 खाटांचे नवीन रुग्णालय सुरू करण्यासाठी भव्य इमारत बांधली आहे. मात्र, हे रुग्णालय खासगी तत्वावर बाहेरील कंपनीला चालविण्यासाठी देण्याचा मार्ग महापालिकेतील सत्ताधारी भाजप आणि प्रशासनाने काढला आहे. त्याला विरोधी पक्षासह सामाजिक संस्था, संघटना आणि नागरिकांचा विरोध आहे. तरी, काल भोसरीचे आमदार महेश लांडगे यांचे समर्थक नगरसेवक आणि महापौर यांनी आयुक्त श्रावण हार्डीकर यांच्याकडे या रुग्णालयात बाह्यरुग्ण तातडीने विभाग सुरू करण्याची मागणी केली आहे.
त्यावर आज लागलीच वैद्यकीय विभागाचे अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पवन साळवे यांनी आपल्या सहका-यांना घेऊन भोसरी रुग्णालयाच्या इमारतीची पाहणी केली. बाह्यरुग्ण विभाग सुरू करण्यासाठी योग्य बाबी तातडीने उपलब्ध करण्याच्या सूचना त्यांनी संबंधित विभागाला केल्या आहेत. मात्र, हे रुग्णालय सुरू करण्यासाठी शहरातून प्रचंड विरोध होत असताना पुन्हा खासगीकरणाचा मुद्दा चिघळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.