वाकडमध्ये भूमिगत सांडपाणी वाहिनीचे कामामुळे हिंजवडीतील वाहतूक व्यवस्थेत बदल
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/04/ht-pune_60e366e0-b1ba-11e8-b8d7-0b252c5c5b16.jpg)
पिंपरी ( महा ई न्यूज ) – हिंजवडी येथे शिवाजी चौक ते इंडियन ऑइल पेट्रोल पंपादरम्यान वाकड रस्त्याच्या बाजूने भूमिगत सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे या भागातील वाहतूकीमध्ये ३० मे पर्यंत बदल करण्यात आले आहेत.
हिंजवडी वाहतूक विभागाचे पोलीस निरीक्षक किशोर म्हसवडे म्हणाले की, हिंजवडी ग्रामपंचायत हद्दीतील शिवाजी चौक ते इंडियन ऑइल पेट्रोल पंप चौकादरम्यान ग्रामपंचायतीपर्यत भूमिगत सांडपाणी वाहिनी टाकण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होत आहे. ही वाहतूक सुरळीत सुरु करण्यासाठी ३० मे पर्यंत वाहतूक व्यवस्थेत बदल करण्यात आले आहेत.
त्यानुसार, टप्पा २ आणि ३ कडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांनी टाटा टी जंक्शन येथून डावीकडे वळून लक्ष्मी चौकातून इच्छित स्थळी जावे. टप्पा एक कडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांनी जॉमेट्रीक सर्कल येथे डावीकडून वळून टाटा टी जंक्शन येथून उजवीकडे वळून लक्ष्मी चौकातून इच्छित स्थळी जावे. वाकडकडून येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांनी इंडियन ऑइल चौक येथून उजवीकडे वळून कस्तुरी चौकातून इच्छित स्थळी जावे. सूर्या अंडरपास येथून येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांनी वाकड नाका येथे डावीकडे न वळता सरळ भूमकर चौकातून इच्छित स्थळी जावे.
तसेच कात्रज, कोथरुड, कर्वेनगर, बाणेर येथून येणाऱ्या सर्व प्रकारच्या जड वाहनांनी मुळा नदी पुलावरुन सेवा रस्त्याने न येता सरळ महामार्गावरुन माय कार चौक येथून डावीकडे वळून भूमकर चौकात इच्छित स्थळी पोहोचावे. तसचे टप्पा १,२,३ कडून शिवाजी चौकात येणाऱ्या सर्व प्रकारच्या हलक्या चार चाकी वाहनांना आणि रिक्षांना इंडियन ऑइल चौकाकडे जाण्यास प्रवेश बंद करण्यात आला आहे. सर्व चार चाकी आणि तीन चाकी वाहनचालकांनी शिवाजी चौकात डावीकडे वळून कस्तूरी चौकातून इच्छित स्थळी पोहचावे, असे आवाहन करण्यात आले आहे.