वयोवृद्धाकडून 32 लाखांची फसवणूक
![Type of witchcraft in Pimpri-Chinchwad; One arrested](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/05/crime-red-theme-5.jpg)
पिंपरी – नफ्यासह दाम-दुपटीने अमिष दाखवून गुंतवणूकदाराची 32 लाख 30 हजार रुपयांची फसवणूक केल्याप्रकरणी पुण्यातील एका 70 वर्षाच्या वृद्धावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सचिन मोरे (वय-38, रा. चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. ही घटना मे 2016 ते आजपर्यंत चिंचवड, पूर्णानगर येथे घडली.
आरोपी ज्येष्ठ नागरिकाने फिर्यादीला “मी दिल्लीतील नॉन बॅकिंग फायनान्शियल कॉर्पोरेशन फायनान्स कंपनीचा एजंट’ आहे. आर्थिक गुंतवणूक केल्यास तुम्हाला एका वर्षात दुप्पट परतावा देण्याचे आमिष दाखविले. या आमिषाला बळी पडून मोरे यांनी रोख व धनादेशाव्दारे एकूण 43 लाख 25 हजार रूपयांची गुंतवणूक केली. आरोपीने मोरे यांना नफा झाल्याचे सांगून दोन टप्प्यामध्ये 10 लाख 95 हजार रूपये दिले.
त्यानंतर आणखी गुंतवणूक करण्यास सांगितले. मोरे यांनी गुंतवणूक करण्यासाठी पैसे नसल्याचे सांगून उर्वरित रक्कम देण्याची मागणी केली. आरोपीने वेळोवेळी आश्वासन देत पैसे न देता तब्बल 32 लाख 30 हजार रूपयांची आर्थिक फसवणूक केली. निगडी पोलीस अधिक तपास करत आहेत.