breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

लोकसंवाद : कोविड योद्धांना धन्यवाद… तुमच्यामुळेच पिंपरी-चिंचवडकर सुरक्षित!

महापालिका प्रशासनाची कामगिरी : कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात ठेवण्यात यश

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी

संपूर्ण जगभरात कोरोना विषाणुचा कहर सुरू आहे. भारतामध्ये गेल्या ७० दिवसांपासून लॉकडाउन सुरू आहे. देशातील सर्वाधिक रुग्ण असलेल्या महाराष्ट्रामध्ये मुंबई- पुणे ही दोन्ही शहरं ‘हॉटस्पॉट’झाली आहेत. मात्र, पुण्याला लागून आणि मुंबईच्या अत्यंत जवळ असलेल्या पिंपरी-चिंचवडमध्ये कोरोना रुग्णांची संख्या अद्यापपर्यंत नियंत्रणात आहे. या कामगिरीचे मानकरी या शहरातील ‘कोरोना योद्धे’ आहेत. त्यामुळे पिंपरी-चिंचवडकरांच्या सुरक्षेचा भार खांद्यावर घेतलेल्या कोरोना योद्धांना एक नागरिक म्हणून धन्यवाद देणे…हे प्रत्येक शहरवासीयाचे कर्तव्य आणि नैतिक जबाबदारी आहे.

पिंपरी-चिंचवडची लोकसंख्या सध्या सुमारे २५ लाखांच्या घरात आहेत. औद्योगिक आणि आयटी क्षेत्राचा या शहरामध्ये समावेश. नोकरदार आणि कष्टकऱ्यांची ही  कामगार किंवा औद्योगिक नगरी. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये २२ मार्चला  लॉकडाउनची घोषणा करण्यात आली. त्यानंतर ‘उद्योगनगरी’ठप्प झाली. पहिला प्रश्न होता तो अचानक बंद झालेल्या रोजगारामुळे ज्या नागरिकांचे हातावर पोट आहे. अशा नागरिकांना दोन वेळचे जेवण उपलब्ध झाले पाहिजे. महापालिका प्रशासनाने तात्काळ निर्णय घेवून ‘कम्युनिटी किचन’ची संकल्पना राबवली. त्याअंतर्गत प्रत्येक क्षेत्रीय कार्यालयाला तीन लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन देण्यात आला. त्याद्वारे आवश्यक धान्य उपलब्ध करुन गरजु नागरिकांना पोटभर जेवण मिळाले. त्यानंतर आतपर्यंत ११ हजार ६५८ नागरिकांचे होम क्वारंटाईन, ४ हजार ९ १३ नागरिकांना २८ दिवसांचे अंडर सर्व्हायलन्स करण्यात आले. सध्यस्थितीला शहरात आतापर्यंत ४७१ कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी २०८ रुग्ण पूर्णपणे बरे होवून घरी गेले आहेत. उर्वरित २५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. शहरातील आतापर्यंत ७ रुग्णांना प्राण गमवावे लागले आहेत.

सध्यस्थितीतील २५६ ॲक्टिव्ह रुग्णांपैकी लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या २१५ इतकी, तर लक्षणे असलेल्या रुग्णांची संख्या १८ आहे. त्यापैकी ९ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.

आयुक्त श्रावण हर्डिकर आणि टीमचे कौतूक…

कोविड-योद्धा म्हणून पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासनातील आरोग्य, वैद्यकीय आणि भांडार विभाग सर्वाधिक चर्चेत राहिले आहेत. महापालिका आयुक्त म्हणून श्रावण हर्डिकर यांनी कोविड विषाणुची परिस्थिती हाताळण्यात यश मिळवलेले आहे. कारण, चार-पाच दिवसांपूर्वी रोज आठ-दहा रुग्ण आढळणारी संख्या अचानक ४०च्या पुढे गेली होती. मात्र, ही परिस्थिती पुन्हा नियंत्रणात येताना दिसत आहे. (आज रुग्ण संख्या २० इतकी होती.) शहरातील रुपीनगर, तळवडे, आनंदनगर आदी भागात आयुक्तांनी स्वत: भेट दिली. उद्योगनगरीला पूर्वपदावर आणण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न केले. विशेष म्हणजे, फेसबूक लाईव्हच्या माध्यमातून आठ ते दहा सेशन घेवून नागरिकांच्या संपर्कातही राहिले. जनजागृती केली. नागरिकांना आधार दिला आणि महापालिका कर्मचाऱ्यांच्या आरोग्याचीही काळजी घेतली. होय…मुंबई आणि पुण्यात कोविड योद्धे धारातिर्थी पडल्याच्या बातम्या आल्या आहेत. पण, पिंपरी-चिंचवडमध्ये आयुक्तांनी एकही कोविड योद्धा गमावलेला नाही, ही वस्तुस्थिती आहे. प्रशासकीय सर्व अनुभव वापरुन कोविड-19 च्या संकटाला हातळण्यात आयुक्तांनी यश मिळवलेले आहे, असेच दिसते. जागतिक आरोग्य संघटनेते मुंबईतील उपाययोजनांबाबत मुंबई महापालिका आणि प्रशासनाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केले. त्यामुळे पिंपरी-चिंचवडमध्येसुद्घा श्री. हर्डिकर आणि त्यांच्या सर्व टीमचे कौतुक व्हायला पाहिजे.

प्रशासनाला आधार देण्याची गरज..खच्चीकरण नको…

प्रशासनाकडून उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, कोविड-19 च्या नियंत्रण आणि उपाययोजनांसाठी जिल्हा प्रशासनाकडून अद्यापर्यंत २ कोटी २५ लाख रुपयांचा निधी उपलब्ध झाला आहे. मात्र, आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी महापालिका अधिनियम ६३/६ नुसार सांसर्गिक किंवा संक्रमण रोगाने आजारी असलेल्या किंवा अशा रोगाची बाधा झाल्याची शंका असलेल्या व्यक्तींना वेगळे ठेवण्यासाठी व उपचार करण्यासाठी असलेल्या रुग्णांलयांसहित सार्वजनिक रुग्णालये  व दवाखाने बांधणे किंवा संपादन करणे व ती सुस्थितीत ठेवणे आणि सार्वजनिक वैद्यकीय साह्यासाठी आवश्यक असतील अशा अन्य उपाययोजना करण्याचा अधिकाराचा वापर केला. त्यामुळेच प्रशासनाने आतापर्यंत १ कोटी ७३ कोटी रुपयांची आयसीयु उपकरणे आणि पीपीई कीट खरेदी करण्यात आली आहेत. तसेच, औषधे आणि अन्य साधणे असे सुमारे १ कोटी २४ लाख रुपयांची खरेदी झाली आहे. किटकनाशके, जंतुनाशके, सॅनिटाईझर, साबन, मास्क, हॅन्डग्लोज, थर्मामीटर, निवारा केंद्र आवश्यक साहित्य आदींच्या खरेदीसाठी सुमारे ४ कोटी ८९ लाख रुपयांची खरेदी केल्याचे समजले आहे. मात्र, खरेदीवरुन आरोप- प्रत्यारोप सुरु आहेत. आतापर्यंत आणि यापुढेही केलेल्या खरेदीमध्ये झालेली अनियमितता भविष्यात उजेडात येईल किंवा आणता येईल. पण, या संकटकाळात राजकारण किंवा विरोधाला विरोध न करता प्रशासनाला सर्वांनीच सहकार्य करण्याची अपेक्षा आहे. महापालिका प्रशासन आणि आयुक्तांनी जातीने लक्ष घालून कर्मचाऱ्यांना वेळेपूर्वीच सुरक्षा साधणे उपलब्ध करुन दिली. लॉकडाउन सुरू असल्याने साहित्य उपलब्ध करण्यात अनेक अडचणी होत्या. त्यामध्ये मार्ग काढून आयुक्तांनी रुग्णांना तात्काळ सेवा उपलब्ध करुन दिली. त्यामुळे आजपर्यंत तरी कोणी रुग्णाची हेळसांड झाल्याचे ऐकिवात नाही. धोरणात्मकदृष्ट्या महापालिका प्रशासन योग्य रितीने काम करीत आहे. प्रशासनातील लोकांचे मानसिक खच्चीकरण हाईल, अशी कोणतीही कृत लोकप्रतिनिधी आणि एक सामन्य नागरिक म्हणून कोणीही करणे, न्यायाला धरुन राहणार नाही…हे निर्विवाद सत्य आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button