लष्कर हद्दीचा तिढा, रस्ते खुले करण्यास केंद्रीय संरक्षण मंत्री सकारात्मक
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/06/nirmala-sitharaman-ap-L-1-1-1.jpg)
- भाजपच्या शिष्टमंडळाची दिल्ली दरबारी भेट
- केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा
पिंपरी- शहरातील लष्कराच्या हद्दीतील रस्ते बंद केले आहेत. ते सुरू करण्यासाठी शहर भाजपच्या पदाधिका-यांनी केंद्रीय संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांची बुधवारी (दि. 6) दिल्लीत भेट घेतली. रस्त्याची माहिती तातडीने मागवून घेतली असून हे रस्ते खुले करण्यासाठी सीतारामन सकारात्मक असल्याची माहिती सभागृह नेते एकनाथ पवार यांनी दिली.
पिंपरी-चिंचवड शहरातील संरक्षण खात्यासंदर्भातील प्रश्न सोडविण्यासाठी भाजपचे शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने बुधवारी (दि.6) दिल्लीत केंद्रीय सरंक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांची भेट घेतली. या शिष्टमंडळात सभागृह नेते एकनाथ पवार, नगरसेवक शत्रुघ्न काटे, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले, दीपक गांगुर्डे यांचा सहभाग होता.
पिंपरी-महापालिकेच्या चारही बाजूने लष्कराची हद्द आहे. त्यामुळे लष्कराच्या हद्दीतून जाणारे रस्ते व इतर सुविधांबाबतचे अनेक प्रश्न वर्षानुवर्षे प्रलंबित आहेत. संरक्षण विभागाने सुरक्षेच्या कारणास्तव बंद केले आहेत. रस्ते बंद केल्यामुळे नागरिकांना लांबून वळसा घालून जावे लागत आहे. भाजपच्या नेत्यांनी बोपखेल, पिंपळे सौदागरच्या रस्त्याची माहिती संरक्षणमंत्र्यांना सांगितली.
सरंक्षणमंत्र्यांनी ब्रिगेडीअर अशोक आंबरे यांना त्वरित बोलावून घेतले. त्यांच्याकडून रस्त्यांची संपूर्ण माहिती घेतली. रस्ते का बंद केले गेले आहेत, याची माहिती घेतली. तसेच याबाबतचा सविस्तर अहवाल त्यांनी मागवून घेतला आहे. तसेच, संरक्षण विभागाचे आणि पालिकेचे अधिकारी यांची लवकरच एकत्रित बैठक घेऊन रस्त्याचा प्रश्न सोडविण्यात येईल, असे पवार यांनी सांगितले.