रेडझोन हद्दीत घरे होण्याला महापालिकाच जबाबदार – धनंजय आल्हाट
![Radhjon Haddit Ghare Honyala Mahaparicach Jawadar - Dhananjay Alhat](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/02/dhanjay-aalhat.jpg)
– अनधिकृत असताना नागरिकांना सुविधा दिल्या का ? आता कारवाई कशाला आल्हाट यांचा सवाल
पिंपरी । प्रतिनिधी
रेडझोन हद्दीत असूनही नागरिकांनी घरे बांधली. त्याठिकाणी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सुविधा दिल्या. आता महापालिकेच्या अतिक्रमण विभागाकडून अनधिकृत ठरवत नागरिकांची घरे पाडली जात आहेत. मुळात अनधिकृत असतानाही महापालिकेने सुविधा दिल्याचं कशा असा, सवाल नगरसेवक धनंजय आल्हाट यांनी उपस्थित केला. तसेच रेडझोन हद्दीत दुय्यम निबंधकाकडून जमिनीचे खरेदीखत का केली या बाबत मुख्यमंत्र्यांकडे चौकशीची मागणी करणार असल्याचे आल्हाट म्हणाले. तसेच स्थानिक पुढाऱ्यांकडून रेड झोन हद्दीत बेकायदेशीर प्लॉटिंगचे व्यवहार झाले असल्याचे आरोप त्यांनी सोशल मीडियाद्वारे केला.
आल्हाट म्हणाले की, पिंपरी चिंचवड महापालिकेचा अतिक्रमण विभाग अतिक्रमण विरोधात कारवाई करत आहे. महापालिका हद्दीतील, रेडझोन मध्ये येणारी सव्वाशे घरे महापालिकेकडून जमिनोदोस्त करण्यात आली आहेत. मुळात रेडझोन हद्दीत घरे बांधत असताना महापालिकेचेच दुर्लक्ष झाले असल्याचे चित्र आहे. स्थानिक पुढारयांच्या पाठिंब्याने प्लॉटिंग करण्यात आली. त्याठिकाणी गोरगरिबांनी घरे घेतली. या ठिकाणी कोणतीही कारवाई होणार नाही असे नागरिकांना वाटले. त्यानंतर महापालिकेनेही पाणी, वीज पुरवठा, ड्रेनेज, रस्ता आदी सुविधा दिल्या. रेड झोन अनधिकृत असताना या सुविधा का दिल्या असा सवाल आल्हाट यांनी उपस्थित केला.
अचानक झालेल्या कारवाईमुळे लोकांवर आत्महत्या करण्याची वेळ आली आहे. त्याची दखल वेळीच घेणे गरजेचे आहे. दुय्य्म विभागाने बेकायदेशीर व्यवहार का केले असा सवाल उपस्थित केला. महापालिकेने सुरुवातीपासून लक्ष देणे गरजेचे होते. या झालेल्या बेकायदेशीर व्यवहाराची चौकशी करण्याची मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे करणार असल्याची माहिती आल्हाट यांनी दिली. मनोहर परिकर संरक्षण मंत्री असताना तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना अनधिकृत बांधकामावर कारवाई करण्याचे पत्र दिले होते. मात्र त्याकडे भाजपा पदाधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे आज होणाऱ्या अनधिकृत बांधकामावरील कारवाईला भाजपचे पदाधिकारी, महापालिका अधिकारी जबाबदार आहेत. तसेच दुय्यम अधिकारी यांची खरेदी खत कस झाले यावर चौकशी करण्याची मागणी करणार असल्याचे धनंजय आल्हाट यांनी सांगितले.