राष्ट्रीय कुडो पंच परीक्षेत पिंपरी-चिंचवडचे घवघवीत यश
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/05/Kudo-National-Referee-With-KIFI-Team.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड कुडो असोसिएशनचे प्रशिक्षक अरविंद मोरे यांच्यासह सहाजणांनी राष्ट्रीय कुडो पंच परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. या परिक्षेत सोळाहून अधिक राज्यातील प्रशिक्षकांनी सहभाग घेतला होता.
क्रीडा व युवक सेवा संचालनालय मान्यताप्राप्त कुडो इंटरनॅशनल फेडरेशन ऑफ इंडियाद्वारा राष्ट्रीय स्तर पंच परीक्षा व स्पर्धा – २०१९ चे खंडाळा येथे आयोजित केल्या होत्या. ५ ते ११ मे दरम्यान ही परीक्षा व स्पर्धा पार पडली. त्यामध्ये महाराष्ट्र, राजस्थान, गुजरात, तेलंगणा, गोआ, मध्य प्रदेश, अंदमान निकोबार, जम्मू काश्मीर, आसाम, उत्तर प्रदेश, बिहार, वेस्ट बंगाल, न्यू दिल्ली, हिमाचल प्रदेश, छत्तीसगड, दमण दीव इत्यादी राज्यातून स्पर्धक सहभागी झाले होते. त्यात महाराष्ट्रातून पिंपरी-चिंचवड जिल्हा कुडो असोसिएशनमधून अरविंद मोरे, शितल मोरे, हिमाली वाहलकर, अमेय पिसाळ, हेमंत उईके, गार्गी मोरे यांनी सहभाग घेतला.
राष्ट्रीय पंच परीक्षेत पिंपरी-चिंचवड कुडो असोसिएशनचे अरविंद मोरे, शीतल मोरे, हिमाली वाहलकर, अमेय पिसाळ व हेमंत उईके यांनी परीक्षा उत्तीर्ण केल्यामुळे त्यांचा सन्मान करण्यात आला. सोशीहान मेहुल वोरा (अध्यक्ष – कुडो इंटरनॅशनल फेडेरेशन ऑफ इंडिया), हांशी पर्सी बहमनी (तांत्रिक अधिकारी – कुडो इंटरनॅशनल फेडेरेशन ऑफ इंडिया), रेनशी जस्मिन मखवाणा (सचिव – कुडो असोसिएशन महाराष्ट्र ) यांच्या हस्ते प्रमाणपत्र व रेफ्री किट देऊन सन्मान करण्यात आला.
सन २०१९ – २० मध्ये पिंपरी-चिंचवड शहरात शालेय कुडो स्पर्धेचे आयोजन जिल्हा क्रीडा अधिकारी पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका यांच्यामार्फत करण्यात येणार आहे. त्यामध्ये शासकीय पंच म्हणून शालेय कुडो स्पर्धेची जबाबदारी यांच्यावर सोपविण्यात येणार आहे. राष्ट्रीय पंच परीक्षेत व स्पर्धेत यश संपादन केलेल्यांचे पिंपरी-चिंचवड कुडो असोसिएशनचे अध्यक्ष अरविंद मोरे यांनी अभिनंदन केले आहे.