Breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
राष्ट्रीय अनुसुचित जाती-जमाती आयोगाची पिंपरी महापालिका आयुक्तांना नोटीस
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/201705051840037233_Pimpri-chinchwad-on-the-72-position-in-the-clean-city-list_SECVPF.jpg)
सफाई कर्मचा-यांच्या प्रश्नांकडे कानाडोळा
पिंपरी (महा ई न्यूज ) – महापालिकेत काम करणा-या सफाई कर्मचा-यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाने पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्तांना नोटीस बजावली आहे. येत्या ३० दिवसात कार्यपुर्तता अहवाल सादर करावा, अन्यथा आपल्याविरोधात समन्स जारी करु, असा इशाराही दिला आहे.
पिंपरी – चिंचवड महापालिका आरोग्य विभाग तक्रार निवारण समितीचे उपाध्यक्ष अॅड.सागर चरण यांनी याबाबत माहिती दिली. ते म्हणाले की, महापालिकेत सफाई कर्मचा-यांना सुरक्षा साधने दिली जात नाहीत. मास्क, हातमोजे, गमबुट, बारा साबण, सहा मोठे हातरुमाल, दरमहा दोन झाडू नियमितपणे दिले जात नाहीत. पावसाळा संपल्यावरही अजूनही रेनकोटचे वाटप केलेले नाही. महिला सफाई कर्मचा-यांना आरोग्य कोठीत पिण्याचे पाणी, स्वच्छतागृह आणि ‘चेंजिंग रुम’ उपलब्ध नाही. तक्रारदार महिलांना अधिकारी अवमानकारक वागणूक देतात.
सफाई कर्मचा-यांच्या वारसा नेमणुकीसाठी नेमलेल्या लाड – पागे समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी करण्यात येत नाही. पदोन्नती, अनुकंप वारसा नियुक्ती रखडली आहे. निवृत्तीनंतरच्या देय रकमा थकविण्यात आल्या आहेत. सफाई कर्मचारी आणि त्यांचे पुनर्वसन कायदा २०१३ चे सर्रास उल्लंघन केले आहे. २५० हून अधिक सफाई कर्मचा-यांना मोफत घरकुलांपासून वंचित ठेवले आहे. याबाबतच्या सुमारे १०० हून अधिक तक्रारी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याकडे करण्यात आल्या. तथापि, त्यांनी त्याकडे कानाडोळा केला. गेली नऊ महिने पाठपुरावा करुनही आयुक्तांनी दाद दिली नाही.
त्यामुळे नवी दिल्लीतील राष्ट्रीय अनुसूचित जाती आयोग, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग आणि राष्ट्रीय सफाई कर्मचारी आयोगाकडे लेखी तक्रार करण्यात आली. अॅड.सागर चरण यांच्या नेतृत्त्वाखालील शिष्टमंडळाने आयोगाच्या अध्यक्षांची प्रत्यक्ष भेट घेऊन तक्रारींचा पाढा वाचला. त्याची तातडीने दखल घेत राष्ट्रीय आयोगाने राज्याच्या मुख्य सचिवांना नोटीस बजावली आहे. सागर चरण यांनी केलेल्या तक्रारींची दखल घेऊन योग्य ती कार्यवाही करावी. त्याबाबतचा कार्य पुर्तता अहवाल तीस दिवसात आयोगाला सादर करावा, अन्यथा दिवाणी न्यायालयाच्या अधिकारांचा वापर करत आपणास उपस्थित राहण्यासंदर्भात समन्स बजाविण्यात येईल, याची दक्षता घ्यावी, असे नोटीसीत नमूद आहे.
सफाई कर्मचा-यांचा सत्कार का नाही ?
महापालिकेत साफसफाईचे उत्कृष्ट काम करणा-या कर्मचा-यांना सप्टेंबर महिन्यात स्मृतीचिन्ह, श्रीफळ देऊन सत्कार केला जातो. गेली तीन वर्षे ही परंपरा सुरु आहे. तथापि, यंदा त्यात खंड पडला. कोणाशीही चर्चाविनिमय न करता सफाई कर्मचा-यांचा सत्कार समारंभ पुढे ढकलल्यात आल्याचे आरोग्य कार्यकारी अधिकारी मनोज लोणकर यांनी अंतिम क्षणी सांगितले. त्यासाठीचे कोणतेही सबळ कारण त्यांनी सांगितले नाही. सफाई कर्मचा-यांना दिल्या जाणा-या या अवमानकारक वागणुकीची तक्रार तीनही राष्ट्रीय आयोगांकडे करण्यात आली. त्याची दखल घेत सफाई कर्मचा-यांचा सत्कार समारंभ महापालिकेने का घेतला नाही ? याबाबतचा तथ्यात्मक अहवाल पंधरा दिवसात सादर करावा, असे आदेश महापालिका आयुक्तांना बजाविण्यात आले आहेत, असे अॅड. सागर चरण यांनी सांगितले.