राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेची “जम्बो” कार्यकारिणी जाहीर; 150 हून अधिक पदांचे वाटप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/10/Nationalist-Congress-Party-NCP.jpg)
पिंपरी, (महा-ई-न्यूज) – आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्ष संघटन मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेची शहर कार्यकारिणी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यकारिणीमध्ये दिडशेहून अधिक पदांचे कार्यकर्त्यांना वाटप करण्यात आले आहे. या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून शहरातील नागरिकांना भेडसावणारे प्रश्न सोडविण्यासाठी “ग्रासरुट”ला काम केले जाणार आहे.
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांसाठी अवघ्या काही महिन्यांचा कालवधी राहिलेला आहे. या निवडणुकीला सामोरे जाताना समाजातील तळागाळात पक्षाचे संघटन मजबूत करण्याचे टार्गेट राष्ट्रवादीचे कारभारी अजित पवार यांनी पिंपरी-चिंचवड शहर संघटनेसह विद्यार्थी संघटनेला दिले आहे. म्हणून विद्यार्थी संघटनेचे पदाधिकारी कामाला लागले आहेत. त्यांनी संघटनेची कार्यकारिणी नुकतीच जाहीर केली आहे. जवळपास दिडशेहून अधिक पदे वाटप केली आहेत. 32 प्रभागानुसार प्रत्येक प्रभागात कमीत-कमी पाच आणि जास्तीत-जास्त सहा पदांवर कार्यकर्ते नियुक्त केले आहेत.
या पदाधिका-यांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांना भेडसावणारे प्रश्न सोडविण्यात येणार आहेत. पाणी पुरवठा, कचरा, वाहतूक कोंडी, आरोग्य, वैद्यकीय सुविधा आदीसह दैनंदीन भेडसावणा-या समस्यांपासून ते पालिकेने राबविलेले मोठ-मोठे प्रकल्प मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा केला जाणार आहे. त्याचबरोबर पक्षाने पिंपरी-चिंचवडच्या विकासात दिलेले योगदान समाजातील तळागाळात पोहोचविण्यात येणार आहे. नागरिकांना पक्षाने केलेली विकास कामे सांगितली जाणार आहेत, अशी माहिती राष्ट्रवादी विद्यार्थी संघटनेचे शहराध्यक्ष सुनिल गव्हाणे यांनी सांगितली.