breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

राष्ट्रवादी नगरसेवकांचे दगडाखाली हात; भाजप विरोधात सानेंची एकाकी लढत

  • नगरसेवकांत एकजुटीचा अभाव
  • शहरात पक्षाची प्रतिमा ढासळली

पिंपरी (महा ई न्यूज)- महापालिकेतील सत्तेची कायम उब भोगणा-या राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्यांना सत्ताधारी भाजपच्या कारभाराच्या विरोधात ठोस भूमिका घेता येत नसल्याने पक्षाचे 36 नगरसेवक असुनही विरोधी पक्षनेता दत्ता साने यांना एकाकी लढत द्यावी लागत आहे. राष्ट्रवादीच्या कार्यकाळात भाजप, शिवसेनेच्या अवघ्या दोन-चार नगरसेवकांनी याच नेत्यांना घायकुतीला आणून पालिकेतील पाशवी बहुमताचे वर्चस्व हाणून पाडले. आता दगडाखाली हात अडकल्याने राष्ट्रवादीचे नगरसेवक भरकटल्यासारखे वागू लागले आहेत. भाजपच्या कार्यपध्दतीविरोधात कडक भूमिका घेण्यापासून पळ काढू लागल्याने विरोधी पक्षनेत्याला एकाकी लढत द्यावी लागत आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत बहुमताच्या जोरावर राष्ट्रवादीने सलग पंधरा वर्षे सत्ता उपभोगली. पक्षाचे कारभारी अजित “दादा” पवार यांचा एकहाती हुकूम असल्याने राष्ट्रवादीच्या स्थानिक नेत्यांनी पालिका प्रशासनावर रुबाब केला. ही पकड कायम ठेवल्यामुळे शहरातील कोट्यवधी रुपयांचे विकास प्रकल्प सत्यात उतरले. शहराचा कायापालट झाल्यानेच राष्ट्रवादीच्या नेत्यांना जनतेने डोक्यावर घेतले. त्यामुळे विरोधात नेमके करायचे तरी काय?, असा प्रश्न राष्ट्रवादीच्या नेत्यांना आजही भेडसावत आहे. त्यातच पंधरा वर्षात कोट्यवधींची कामे करण्यासाठी ठेकेदार आणि प्रशासनाला कळसुत्री बहुलीप्रमाणे हाताळताना बहुतांश नगरसेवकांचे हात दगडाखाली अडकले आहेत. नेमकी हीच कुंडली पालिकेतील सत्ताधारी भाजप नेत्यांच्या हाती असल्याने राष्ट्रवादीचा एकही नेता भाजपच्या कारभाराविरोधात ब्र शब्द काढायला तयार नाही. केवळ मोघम आरोप करत परिस्थिती रेटून नेण्याचा केविलवाना प्रयत्न होत आहे. गेल्यावर्षी माजी विरोधी पक्षनेते योगेश बहल यांनी एक वर्षाच्या कार्यकाळात भाजपच्या विरोधात ठोस भूमिका घेतली नाही. उलट सत्ताधारी भाजप नेत्यांच्या हातात हात घालून त्यांना रान मोकळे सोडले. नेत्यांच्या अशा वागण्यामुळे भाजपच्या कार्यकाळातील पहिल्याच वर्षात राष्ट्रवादीच्या प्रतिमेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

पक्षाची प्रतिमा पालिकेच्या राजकारणात स्वच्छ व आक्रमक ठेवण्यासाठी दुस-या वर्षात विरोधी पक्षनेता पदावर परखड वक्तव्याने प्रचलीत असलेले दत्ता साने यांना बसविले. त्यांनी भाजपच्या चुकीच्या कामावर बोट ठेवून सत्ताधा-यांना वारंवार रोखण्याचा प्रयत्न केला. सत्ताधा-यांच्या तालावर नाचणा-या प्रशासनाला सबक शिकविण्यासाठी त्यांनी वेळोवेळी आंदोलने केली. मात्र, आजची परिस्थिती पाहता राष्ट्रवादीचे इतर नेते पक्षासोबत तटस्थ नसल्याचे जाणवू लागले आहे. दगडाखाली हात अडकल्याने भाजप पदाधिका-यांसोबत हात मिळवणी करून विरोधी रथाचा गाडा ढकलण्याचे काम केले जात आहे. काही नेत्यांचे थेट भाजप नेत्यांसोबत व्यवसायिक लागेबांधे असल्यामुळे राष्ट्रवादीचे नेते विरोधात बोलायला तयार नाहीत. सभागृहात शहराविषयी चिंता व्यक्त करणा-या महिला नगरसेविका, तसेच नगरसेवक पक्षाच्या अन्य कार्यक्रमापासून दूर राहत आहेत. तर, अलिकडे आंदोलन करणे बंद करुन केवळ कागदोपत्री घोडे दामटण्याचा उद्योग चालवला आहे. विरोधी पक्षनेत्याच्या बाजुने सत्ताधा-यांच्या विरोधात कोणी बोलायला तयार नसल्यामुळे पक्षाची प्रतिमा संकटात सापडली आहे.

 

नगरसेवकांची “दादां”पुढे होणार पोलखोल
एकुणच राष्ट्रवादीच्या बदनामीला कारणीभूत ठरणा-या नगरसेवकांची अजित दादांपुढे पोलखोल होणार आहे. येत्या 5 सप्टेंबर रोजी दादा पुण्यात येणार आहेत. त्यावेळी पक्षनेते दत्ता साने दादांना भेटायला जाणार असल्याचे समजते. शहरातील एकुणच पक्षाची स्थिती आणि नगरसेवकांच्या हालचाली दादांच्या कानावर घातल्या जाणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे पक्षासोबत गद्दारी करून भाजपला साथ देणा-या नगरसेवकांची आता खैर नाही. कारण, दादांनी याही नगरसेवकांना भेटायला बोलवल्याचे समजते. या भेटीत दादा कोणावर भडकणार, याबाबत कामचुकार नगरसेवकांची पाचावर धारण बसली आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button