राष्ट्रवादीच्या डॉ. कोल्हेंचे पिंपरी-चिंचवडमध्ये ‘लक्ष्य’; पण, माजी आमदार विलास लांडेंकडे ‘दुर्लक्ष’ ?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/10/Amol-Kolhe.jpg)
काळभोरनगरमधील पत्रकार परिषदेला लांडे-पानसरे यांची अनुपस्थिती
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीसह ‘महाविकास’ आघाडीची जबाबदारी आता शिरुरचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना दिली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादीसह शिवसेना आणि काँग्रेसमधील स्थानिक नेत्यांमध्ये नाराजीचा सूर आहे.
खासदार डॉ. कोल्हे यांनी शुक्रवारी काळभोरनगर येथील हॉटेलमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली. त्यानंतर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेला शहरातील पक्षाचे दिग्गज नेते माजी आमदार विलास लांडे आणि माजी महापौर आझमभाई पानसरे यांची अनुपस्थिती होती. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसने विरोधी पक्षांची भूमिका वठवली आहे. यापुढे मी नगरसेवकांच्या खांद्याला खांदा लावून काम करणार आहे. पालिकेतील पूर्ण भ्रष्टाचार उखडून काढणार आहोत. यापुढे आमची विरोधाची धार वाढणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांबाबत सत्ताधाऱ्यांनी आडवा आणि जिरवाची भूमिका घेतल्यास अडविणाऱ्याची जिरविणार आहोत, असा इशारा खासदार कोल्हे यांनी दिला आहे. यावरुन आगामी काळात पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादीची सूत्रे डॉ. कोल्हेंच्या हाती दिली जाणार असेच संकेत पक्षश्रेष्ठींनी दिले आहेत.
माजी आमदार लांडे २०१९ मध्ये शिरुर लोकसभा मतदार संघातून निवडणुकीसाठी इच्छुक होते. त्याबाबत त्यांनी तयारीही केली होती. मात्र, ऐनवेळी पक्षाने डॉ. कोल्हेंना मैदानात उतरवले. परिणामी, लांडे यांना माघार घ्यावी लागली. त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीतही स्व. दत्ता साने की लांडे या चर्चेत राष्ट्रवादीची उमेदवारी बारगळली होती. शेवटी राष्ट्रवादी पुरस्कृत म्हणून लांडे निवडणूक लढले. त्याचा पुरेपूर फायदा भाजपाला झाला. त्याची सल राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये आहे. आता शहरातील राजकारणात निर्णय प्रक्रियेत लांडेंच्या हाती सूत्रे मिळावीत, अशी स्थानिक कार्यकर्त्यांची मागणी आहे. दुसरीकडे, माजी महापौर आझमभाई पानसरे यांनाही पक्षातील निर्णय प्रक्रियेत सहभागी करुन घेतले पाहिजे, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मात्र, पत्रकार परिषद आणि स्थानिक निर्णय प्रक्रियेत लांडे-पानसरे यांना डावलले जात आहे का? असा सवाल उपस्थित झाला आहे.
विरोधी पक्षनेता राजू मिसाळ यांचीही अनुपस्थिती…
पिंपरी-चिंचवड महापालिकेत भाजपाची सत्ता आहे. खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात भाजपाच्या कारभारावर आक्षेपही घेतला. पण, महापालिकेतील राष्ट्रवादीचे विरोधी पक्षनेते राजू मिसाळ पत्रकार परिषदेला उपस्थित राहीले नाहीत. एव्हाना, डॉ. कोल्हे यांनी ‘मी यापुढे विरोधी पक्षनेत्याच्या कार्यालयात बसून भाजपाला विरोध करणार…’ अशी गर्जना केली. त्यामुळे मिसाळ यांच्या कार्यक्षमतेवर डॉ. कोल्हे यांना शंका आहे का? असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.