राष्ट्रमाता जिजाऊ म्हणे शिवाजी महाराजांच्या पत्नी ; अकरावीच्या संस्कृत पुस्तकात उल्लेख
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/12/2nikita_prakashan.jpg)
पुणे – अकरावीच्या संस्कृत विषयाच्या पुस्तकात राष्ट्रमाता जिजाऊ यांना शिवाजी महाराजांची पत्नी म्हणून चुकीच्या पद्धतीने दाखवले आहे. शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांची जाणीवपूर्वक बदनामी करत असून, संस्कृत विषयाचे चुकीचे पुस्तक आहे. लेखकासह संबंधितांवर गुन्हे दाखल करावेत, अन्यथा रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही, असा इशारा संभाजी ब्रिगेडने दिला आहे.
संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे की, ‘लातूर येथील निकिता प्रकाशनने प्रकाशित केलेल्या संस्कृत सारिका पुस्तकामध्ये राष्ट्रमाता जिजाऊ यांना शिवाजी महाराजांची पत्नी म्हणून चुकीच्या पद्धतीने दाखविण्यात आले आहे. पुस्तकाचे लेखक राजेंद्र शास्त्री (गायकवाड) हे आहेत. पुस्तकामध्ये चुकीच्या पद्धतीने वंशावळ छापण्यात आली आहे. महाराष्ट्राचे शिक्षणमंत्री आयुक्त, शिक्षण संचालक काय झोपा काढत आहेत का? हा प्रश्न पडला आहे.
शिक्षण विभागाचा भोंगळ कारभार पुढे आला आहे. अभ्यासक्रम विभागाने परवानगी देणे व विद्यार्थ्यांना चुकीच्या पद्धतीने शिकवणे हा जाणीवपूर्वक केलेला खोटारडेपणा असून, तो पुढे आला आहे. गेल्या महिन्यात संभाजी महाराज, तुकाराम महाराजांना चुकीच्या पद्धतीने पुढे आणून विद्यार्थ्यांना शिकवले जात होते. शिवाजी महाराज आणि राष्ट्रमाता जिजाऊ यांची जाणीवपूर्वक बदनामी केली जात आहे. संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड व पुणे जिल्ह्याच्या वतीने शिक्षण विभागाचा निषेध करत असून, याविषयी पोलिसांकडे तक्रार दाखल करणार आहोत. राज्याचे शिक्षण मंत्र्यांनी याबाबतची सखोल चौकशी करून संबंधितांवर तत्काळ गुन्हे दाखल करून कारवाई केली पाहिजे. अन्यथा याचा निषेध करण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही.’