राजकीय स्टंटबाजी: राष्ट्रवादीकडून मुक्या प्राण्यांचा छळ, सीमा सावळेंचा विरोधी पक्षनेत्यावर संताप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/f02759a1-5dc7-48fc-8ea7-fd4d84890d12.jpg)
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेत प्रत्येक विषयावर राजकारण करणाऱ्या राष्ट्रवादीने आज बुधवारी (दि. 19) सर्वसाधारण सभेत मुक्या प्राण्यांचा राजकीय स्टंटबाजीसाठी वापर करण्याचा प्रयत्न केला. विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर लक्ष वेधण्यासाठी ८ ते १० कुत्र्याची पिल्ली बॅगमध्ये बंद करून सभागृहामध्ये आणण्याचा प्रयत्न केला. या प्रकरणावरून भाजपच्या नगरसेविका सीमा सावळे यांनी दत्ता साने यांच्यावर संताप व्यक्त केला. त्यावरून साने आणि सावळे यांच्यामध्ये जोरदार खडाजंगी झाल्याने महापौर राहुल जाधव यांनी सभा दहा मिनिटासाठी तहकूब केली.
भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावर महापालिका प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी दत्ता साने यांनी कुत्र्यांची पिल्ली बंद बॅगमधून आणली होती. ही कुत्र्यांची पिल्ली सभागृहात सोडण्याचा त्यांचा इरादा होता. त्यामुळे सभागृहाबाहेर सावळे यांनी साने यांना ही कृती चुकीची असल्याचे सांगितले. त्यावर साने यांनी माझ्यावर काय गुन्हा दाखल करायचा तो करा, ते मी बघून घेईल, असे उत्तर दिले. यावर सभागृह नेते एकनाथ पवार, राष्ट्रवादीचे नगरसेवक भाऊसाहेब भोईर यांनी दत्ता साने यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला.
त्यानंतर सभागृह सुरू झाल्यानंतर सावळे यांनी साने यांच्या या कृतीचा निषेध केला. एखाद्या प्रश्नाकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी मुक्या प्राण्यांचा छळ कऱण्याची ही कोणती पध्दत? असा सवाल करून त्यांनी साने यांना जाब विचारला. भाजपच्या नगरसेविका आशा शेंडगे, विकास डोळस, नामदेव ढाके यांनी दत्ता साने यांच्या कृतीचा निषेध केला.
दरम्यान, साने यांनी आपल्या या कृतीचे समर्थन करण्याचा प्रयत्न केला. यावेळी बोलताना साने यांनी जातीवाचक शब्दांचा वापर करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर सावळे आणि साने यांच्यामध्ये जोरदार बाचाबाची झाली. दरम्यान सभागहातील या गोंधळातच विविध क्षेत्रातील निधन झालेल्या मान्यवरांना श्रध्दांजली वाहण्यात आली. त्यानंतर सभा दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आली.