… म्हणून पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील वाहतूक वळविली
पिंपरी |महाईन्यूज|
पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर रस्ते विकास महामंडळ, आयआरबी कंपनीच्या वतीने आडोशी बोगद्याजवळ धोकादायक दरडी पाडण्याचे काम सुरू असल्यामुळे द्रुतगती मार्ग बुधवारी दुपारी पंधरा मिनिटांसाठी बंद ठेवण्यात आला. यादरम्यान द्रुतगती मार्गावरील पुण्याकडे येणारी वाहतूक खोपोली मार्गे वळविण्यात आली.
काम उद्या (गुरुवारी) सुरू राहणार आहे. बोरघाटात दरडी कोसळण्याच्या घटनांमुळे द्रुतगती मार्ग धोकादायक झाला होता. रस्ते विकास महामंडळाच्या वतीने गेल्या दोन-तीन वर्षांत शेकडो कोटी खर्च करून द्रुतगती मार्गावर लोखंडी जाळीचे आच्छादन टाकत मार्ग सुरक्षित करण्यात येत आहे. रस्ते विकास महामंडळ व महामार्गाची देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी असलेल्या आयआरबी कंपनीच्या वतीने बुधवारी दुपारी दोन ते तीन वाजण्याच्या दरम्यान द्रुतगती मार्गावरील पुणे आणि मुंबई दोन्ही बाजूकडील वाहतूक थांबविण्यात आली होती.
अचानक आडोशी बोगद्याजवळ उंच डोंगरावरील धोकादायक दरडी पाडण्याचे काम हाती घेण्यात आले. दुपारी मनुष्यबळाच्या साहाय्याने सुट्या झालेल्या धोकादायक दरडी पाडण्यात आल्या. यादरम्यान द्रुतगती मार्गावरील वाहतूक पंधरा मिनिटांसाठी बंद करण्यात आली.