माहिती देण्यास दिरंगाई लावल्याने नगरसेविकेचा प्रशासनावर संताप
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/18403435_101739233737548_5859616426558066520_n.jpg)
पिंपरी – महापालिका प्रशासनाकडून मागितलेली माहिती वेळेत मिळत नसल्याने सत्ताधारी भाजप नगरसेवकांनी संताप व्यक्त केला आहे. नगरसेविका माया बारणे यांनी सर्वसाधारण सभेत प्रशासनाला विचारलेल्या प्रश्नांची माहिती अद्याप प्राप्त झालेली नाही. त्यामुळे प्रशासन जाणिवपूर्वक दिरंगाई करत असल्याचा आरोप केला जात आहे.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा गुरूवारी (दि. 6) झाली. सभेत नगरसेविका माया बारणे यांनी पालिका प्रशासनाला प्रश्न विचारून त्याची माहिती सादर करण्याची मागणी केली होती. शहरात आजवर दिलेल्या बांधकाम परवानग्यांची माहिती?, बांधकाम परवानगी नेमकी कोणी बनविली?, परवाना दिलेल्या बिल्डरांनी पूर्णात्वाचा दाखला घेतला नाही, याची माहिती व अशांवर कोणती कारवाई केली?, पुररेषेतील पूर्वीच्या बांधकामांवर कोणती कारवाई केली?, बिल्डरांना पूर्णात्वाचा दाखला देतानाचे निकष कोणते?. आदी प्रश्नांची माहिती बारणे यांनी प्रशासनाकडे मागितली आहे.
मात्र, चार दिवस उलटून गेल्यानंतर देखील बारणे यांना माहिती देण्यास टाळाटाळ केली आहे. प्रशासन माहिती का देत नाही, असा प्रश्न उपस्थित होत आहे. तातडीने माहिती उपलब्ध करून द्यावी, अन्यथा परिणाम वाईट होतील, असा इशारा बारणे यांनी दिला आहे.