‘महावितरण’ने ‘त्या’ आजीचा जीव घेतला? : इंद्रायणीनगरमधील ‘तो’ ट्रान्सफार्मर अखेर जळाला!
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/Screenshot_20200905_201741-1.jpg)
महावितरण प्रशासनाचा तुघलकी कारभार
धोकादायक ट्रांसफार्मरची तात्पुरती दुरुस्ती
स्थानिक नागरिकांच्या आक्रोशाकडे होतेय दुर्लक्ष
पिंपरी | प्रतिनिधी
इंद्रायणीनगर येथील धोकादायक ट्रान्सफॉर्मरची दुरुस्ती करण्याबाबत वारंवार मागणी करूनही त्याकडे गंभीर दुर्लक्ष केल्याने अखेर ‘तो’ ट्रांसफार्मर आज पूर्णतः जळाला. या भीषण आगीमध्ये शेजारीच असलेल्या घरातील एका आजीचा नाहक बळी गेला, तर लहानग्या बळावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
दरम्यान, धोकादायक ट्रान्सफॉर्मरची कायमस्वरूपी दुरुस्ती करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांनी करीत वीज पुरवठा सुरळीत करण्यासाठी विरोध केला. पण महावितरण प्रशासनाने स्थानिक नागरिकांच्या मागणीकडे दुर्लक्ष करीत आडमुठेपणाने वीजपुरवठा सुरळीत केला. मात्र, पुन्हा एखादी दुर्घटना घडल्यास किंवा जीवितहानी झाल्यास त्याला कोण जबाबदार? असा प्रश्न उपस्थित झाला आहे.
याबाबत भारतीय जनता पार्टीचे इंद्रायणीनगरमधील युवानेते शिवराज लांडगे म्हणाले की, इंद्रायणीनगर मध्ये सेक्टर नंबर 2 नाना-नानी पार्क व राजवाडा परिसरात ट्रान्सफॉर्मर आहे. अनेक दिवसांपासून या परिसरात या ट्रान्सफॉर्मर व केबल संबंधातील तक्रार असल्यामुळे विद्युत पुरवठा खंडित होण्याचे प्रकार घडत होता. अनेक वेळा महावितरणच्या अधिकाऱ्यांशी ट्रान्सफॉर्मर केबल व डीपी संदर्भातील तक्रार केली होती. तात्पुरते काम करून जाण्याचा प्रकार घडत होता. दोन-तीन दिवसाला वीज पुरवठा खंडित होत आहे. जिथे जॉईंट मारेल तिथे नेहमीच स्पारकिंग व्हायचा. पुढे मोठा अनर्थ घडेल या कल्पना देऊनसुद्धा महावितरणच्या अधिकाऱ्यांनी तिकडे दुर्लक्ष केले.
शुक्रवारी ट्रांसफार्मरला मोठी आग लागली. शेजारी लागून असलेले घर थोडक्यात बचावले. महावितरण अधिकाऱ्यांना कळवले व त्यानंतर रात्री उशिरा महावितरणची गाडी ते पुन्हा काम करण्याकरता आले. शेजारी राहणाऱ्या घरातील लोकांनी महावितरणच्या कर्मचाऱ्यांना काम करण्यापासून रोखले. त्यांनी अधिकाऱ्यांना विनंती केली की आम्ही या आगीतून थोडक्यात बचावलो आहोत. तुम्ही आधी आजूबाजूचा परिसर म्हणजेच झाडे- झुडपे साफ करून घ्या आणि मग विद्युत पुरवठा चालू करा. महावितरण प्रशासनाने या गोष्टीकडे दुर्लक्ष करीत शनिवारी पहाटे तीनच्या सुमारास वीज पुरवठा सुरळीत केला. पुन्हा आज दुपारी साडेबाराच्या सुमारास जे व्हायला नको होतं तेच झालं. या ट्रान्सफॉर्मर ला पुन्हा एकदा मोठा बार होऊन मोठी आग लागली. आग एवढी प्रचंड होती अग्निशामक च्या दोन गाड्या बोलावे लागल्या व आग आटोक्यात आण्यात आली.
‘त्या’ आजीच्या मृत्यूला जबाबदार कोण?
शुक्रवारी ट्रांसफार्मरला आग लागली. त्याकडे दुर्लक्ष करीत कायमस्वरूपी उपाययोजना करण्याऐवजी महावितरण प्रशासनाने तात्पुरती डागडुजी केली. पण दुर्दैवाने शनिवारी पुन्हा एकदा ट्रांसफार्मरचा स्फोट झाला. आग आज त्या शेजारच्या घरापर्यंत पोहोचली. जी महिला काल महावितरणच्या अधिकाऱ्यांना सांगत होती ती महिला आज आपल्या पाच महिन्यांच्या नातवाला घेऊन आपल्या घरात बसली असताना या आगीने त्या दोघांना घेरले. आज ती महिला ह्यात दगावली. बाळ हॉस्पिटलमध्ये सिरीयस आहे. याला जबाबदार कोण? असा प्रश्न शिवराज लांडगे यांनी उपस्थित केला आहे.