महापौर, सत्तारुढ पक्षनेते, स्थायी समिती सभापतींना ‘मुदतवाढ’?
![Mayor, ruling party leader, standing committee chairpersons 'extension'?](https://mahaenews.com/wp-content/uploads/2021/01/Dhore-Dhake-Londhe.jpg)
भाजपा आमदार महेश लांडगे, लक्ष्मण जगताप यांचे विचारमंथन
आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपाची मोर्चेबांधणी
पिंपरी । विशेष प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका आगामी निवडणूक आणि कोरोना काळातील ‘सेटबॅक’ च्या पार्श्वभूमीवर महापौर माई ढोरे, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके आणि स्थायी समिती सभापती संतोष लोंढे यांना मुदतवाढ मिळण्याची दाट शक्यता आहे.
पिंपरी-चिंचवड भाजपाचे दोन ‘कारभारी’ अर्थात आमदार महेश लांडगे आणि लक्ष्मण जगताप यांच्यामध्ये महापालिका महत्त्वाच्या पदांबाबत आणि कार्यकाळाबाबत विचारमंथन सुरू आहे.
कोरोना प्रादुर्भाव आणि लॉकडाउनमुळे महापालिकेचे कामकाज आठ महिने संथ होते. शहरातील विकासकामांना ब्रेक लागला होता. भाजपाच्या सूत्रानुसार ‘एक पद- एक नगरसेवक’ अशा पद्धतीने महापालिकेतील पदांचे वाटप करण्यात येते. त्यानुसार महापौर, सत्तारुढ पक्षनेते, स्थायी समिती सभापती यांच्या पदासाठीचा एक वर्षाचा कार्यकाल संपला आहे. मात्र, कोरोना आणि लॉकडाउनमुळे संबंधितांना कामच करता आले नाही. त्यामुळे संबंधितांना मुदतवाढ द्यावी, असा सूर आहे.
सामाजिक समतोल राखण्याचा प्रयत्न…
सध्यस्थितीला आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ढोरे, ढाके आणि लोंढे भाजपासाठी हितकारक चेहरे आहेत. माई ढोरे या मराठा समाजाचे प्रतिनिधित्व करतात. त्या आमदार लक्ष्मण जगताप यांच्या कट्टर समर्थक आहेत. नामदेव ढाके हे जुन्या गटातील निष्ठावंत म्हणून ओळखले जातात. दुसरीकडे शहरात लेवा पाटीदार समाजाचे प्रमाण जास्त आहे. त्यातच विदर्भातून आलेल्या लोकांमध्ये त्याचा जनसपंर्क चांगला आहे. त्यामुळे ढाके भाजपासाठी हिताचेच आहेत. दुसरीकडे संतोष लोंढे हे माळी समाजाचे प्रतिनिधित्व करीत आहेत. शहरात माळी समाज निर्णायक भूमिकेत राहतो. विशेष म्हणजे, लोंढे हे भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यामुळे आगामी निवडणुकीत सामाजिक समतोल राखून मतांचे राजकारण सोपे करण्यासाठी भाजपाचे दोन्ही कारभारी प्रयत्नशील आहेत, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.