महापौरांचे काम म्हणजे ‘उचलली जीभ लावली टाळ्याला’ – विरोधी पक्षनेते राजू मिसाळ
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/09/raju-misal-virodhi-paksha-nete.jpg)
पिंपरी / महाईन्यूज
पिंपरी-चिंचवडच्या प्रथम नागरिक महापौर उषा ढोरे यांना राष्ट्रवादी कॉंग्रेसचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्थायी समिती सभापती केले. ज्या नेत्याच्या आशिर्वादाने आपल्याला राजकीय कारकीर्द गाजवता आली, त्याच नेत्यावर खालच्या पातळीचे आरोप करणे महापौर ढोरे यांना अजिबात शोभत नाही. महापौरांचे काम म्हणजे उचलली जीभ लावली टाळ्याला, अशा शब्दांत विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी आरोप केला आहे.
राज्य सरकारच्या पुढाकाराने तयार केलेल्या जम्बो कोविड रुग्णालयातील कर्मचा-यांना वेतन दिले नाही. कर्मचा-यांना वेतन न देता त्यांच्या तोंडाला पाणे पुसण्याचा उद्योग ठेकेदाराने केला. यातून पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्य सरकारची निष्क्रियता समोर आल्याचा आरोप काल महापौर उषा ढोरे आणि पक्षनेते नामदेव ढाके यांनी केला होता. राज्य सरकार आणि ‘पीएमआरडीए’ यांच्या दुहेरी कामकाजात पिंपरी-चिंचवड महापालिकेची नाहक बदनामी होत असल्याचे महापौर आणि पक्षनेत्यांनी म्हटले. या आरोपाचे खंडण करण्यासाठी विरोधी पक्षनेते राजू मिसाळ यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजपवर जोरदार पलटवार केला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे कामकाज दररोज सकाळी सहाच्या अगोदर सुरू होते. पालकमंत्री या नात्याने पवार दर शुक्रवारी पुण्यात अधिकारी, पदाधिका-यांची बैठक घेतात. केलेल्या कामाचा आढावा घेतात. त्यामध्ये महापौर ढोरे यांना देखील निमंत्रित केले जाते. त्यावेळी पवार यांच्यासमोर शहराच्या बाबतीत कोणतीही समस्या नसल्याचे महापौर सांगतात. आणि पाठीमागे गलथान कारभार असल्याचा आरोप करतात. भाजपचे तत्कालीन पालकमंत्री गिरीश बापट कितीवेळा पिंपरी-चिंचवडमध्ये आले हे महापौरांनी सांगावे. अजित पवार यांना पिंपरी-चिंचवडकरांविषयी मोठी अस्था आहे. त्यामुळे त्यांनी कोविड सेंटरचे काम सुरू असताना शहरात येऊन त्याचा वेळोवेळी आढावा घेतला. शहरातल्या भाजपच्या एकाही आमदाराने जम्बो कोविड सेंटरला भेट देऊन पाहणी केली नाही. जम्बो कोविड सेंटर उभारण्यात पालिकेने किती आर्थिक वाटा उचलला, याचा दस्तुरखुद्द महापौरांनी खुलासा करावा, असेही मिसाळ यांनी म्हटले आहे.