breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेत सत्तारुढ पक्षनेत्यांच्या दालनात निष्ठावंत पदाधिकारी- नगरसेवकांमध्ये राडा

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी-चिंचवड महापालिकेत सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पक्षातील अंतर्गत कलह वारंवार समोर येत असताना आज निष्ठावंतांमध्ये चांगलाच राडा झाला. एकमेकांच्या सत्तर पिढीचा उद्धार करणार्‍या पदाधिकारी आणि नगरसेवकांमुळे पक्षाची चांगलीच नाचक्की झाली.

पिंपरी-चिंचवड महापालिकेची सन 2017 साली मोदी लाटेवर विराजमान होत भारतीय जनता पक्षाने सत्ता काबिज केली. या पक्षाची महापालिकेवर एकहाती सत्ता असली तरी पक्ष मात्र अंतर्गत पातळीवर विविध गटातटांमध्ये विभागला आहे. भोसरी, चिंचवड आणि निष्ठावंत असे तीन गट सध्या शहरात कार्यरत आहेत. आजापर्यंत भोसरी आणि चिंचवडच्या गटामध्ये कलगीतुरा रंगल्याची अनेक उदाहरणे समोर आलेली असताना आज निष्ठावंतांमध्येच कलगीतुरा रंगला. सुरुवातील शाब्दीक बाचाबाची सुरू असताना त्याचे रुपांतर एकमेकांच्या सत्तर पिढीचा उध्दार करण्यापर्यंत पोहोचले. हा प्रकार सुरू असताना स्थायी समितीच्या एका माजी पदाधिकारी सर्वांची समजूत काढून वाद संपविला मात्र पक्षाच्या एका पदाधिकारी आणि स्विकृत नगरसेवकाने पक्षनेत्याचा दरवाजा जाराने आपटून आपला राग व्यक्त केला.

भली मोठी आश्वासने देऊ तसेच पारदर्शक कारभाराचे वचन देऊन सत्तेत आलेल्या या पक्षातील अंतर्गत कलह, सातत्याने होणारे वाद त्यातच ठेकेदार आणि अधिकार्‍यांच्या माध्यमातून सुरू असलेली ‘दुकानदारी’ यामुळे अगोदरच प्रतिमा काळवंडलेली असताना पुन्हा हा प्रकार घडल्याने महापालिका परिसरात याची चांगलीच चर्चा रंगली होती.

काय आहे पार्श्वभूमी?
वाकड येथील रस्त्यांच्या कामांचा विषय स्थायी समितीने काही आठवड्यांपूर्वी फेटाळला होता. चिंचवडचे आमदार लक्ष्मण जगताप आणि शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे यांच्यामध्ये या विषयावरून चांगलेच राजकीय वातावरण तापले होते. मात्र सध्या राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असल्यामुळे कलाटे यांनी हा विषय राज्य शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्याची विनंती केली हेाती.  यानंतर आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी हा विषय शासनाकडे रस्त्याच्या आवश्यकतेसह व शेरांकनासह पाठविला आहे. यावरून भाजपाचा एक पदाधिकारी आणि स्विकृत नगरसेवक पक्षनेत्यांना जाब विचारू लागला. आयुक्त तुमच्या ऐकण्यात नसतील तर राजीनामा द्या आणि घरी बसा, पक्षाची बदनामी होत असल्याचे सांगत वादाला सुरुवात केली. काही वेळानंतर हा वाद इतका विकोपाला गेला की एकमेकांच्या सत्तर पिढीचा उध्दार करण्यात आला. हा प्रकार अ‍ॅण्टीचेंबरमध्ये सुरू असलेली ही शिविगाळ बाहेरही ऐकू येत असल्याने तिसर्‍या मजल्यावर हा चर्चेचा विषय बनला होता.

घडलेल्या या प्रकाराबाबत पक्षनेते नामदेव ढाके यांच्याशी संपर्क साधून प्रतिक्रिया विचारली असता त्यांनी असा कोणताही प्रकार घडला नसल्याचे सांगितले. तर भाजपाच्या एका पदाधिकार्‍याने मात्र पक्षनेत्यांसोबत किरकोळ बाचाबाची झाल्याच्या प्रकाराला दुजोरा दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button