breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या कार्यक्रमावर शिवसेनेचा “बहिष्कार”

  • गटनेते राहूल कलाटे यांनी व्यक्त केली नाराजी
  • खासदार श्रीरंग बारणे यांनाही मानहानीकारक वागणूक

पिंपरी (अमोल शित्रे) – क्रांतीवीर चापेकर संग्रहालयाच्या इमारतीचा भूमीपूजन सोहळा चिंचवड येथे सोमवारी (दि. 23) दिमाखात पार पडला. या कार्यक्रमाशी भाजपचा कसलाही संबंध नसताना व्यासपीठावरील आसनव्यवस्थेत मात्र, भाजपने राजकारण केल्यामुळे प्रशासनाने प्रोटोकॉलचे पालन केले नसल्याचा ठपका ठेवून शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे चालू कार्यक्रमातून निघून गेले. तर, कार्यक्रमातील भाजप पदाधिका-यांचे मानहानीकारक वातावरण पाहूनच खासदार श्रीरंग बारणे यांनी कार्यक्रमातून काढता पाय घेतला. त्यामुळे पालिकेने आयोजित केलेल्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमावर शिवसेनेने जाहीर बहिष्कार टाकल्याचे चित्र पहायला मिळाले.

 

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या खर्चातून क्रांतीवीर चापेकर बंधुंचे वस्तू संग्रहालय उभारण्यात येणार आहे. त्याचा भूमीपूजन सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सोमवारी घेण्यात आला. या कार्यक्रमाला शिवसेनेचे खासदार शिवाजीराव आढळराव पाटील, स्थानिक खासदार श्रीरंग बारणे, आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार यांना निमंत्रित केले होते. मात्र, खासदार आढळराव पाटील काही कामानिमित्त कार्यक्रमाला येऊ शकले नाहीत. आमदार चाबुकस्वारांच्या मतदार संघाला लागूनच हा कार्यक्रम असल्याने त्यांनी देखील कार्यक्रमाला उपस्थित राहणे नाकारले. मात्र, जनतेशी बांधिलकी असलेले खासदार श्रीरंग उर्फ आप्पा बारणे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आगमणापूर्वीच कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. शिवाय, पालिकेतील गटनेते राहूल कलाटे हे देखील पालिकेचा कार्यक्रम म्हणून वेळेत हजर होते. मात्र, व्यासपीठावरील वातावरण पाहून त्यांनी नाराजी व्यक्त केली.

 

पालिकेच्या कार्यक्रमात पालिकेतील पदाधिका-यांच्या आसनव्यवस्थेची चोख व्यवस्था केली जाते. तशी व्यवस्थाही करण्यात आली होती. मात्र, त्यावर भाजपच्या नगरसेवकांनी तत्पुर्वीच ताबा घेतला होता. त्यामुळे कलाटे यांना आसनस्त होण्यास जागाच मिळाली नाही. प्रशासनाकडे याबाबत त्यांनी विचारणाही केली. मात्र, कोणीच दखल घेतली नाही. आपल्याला सापत्न वागणूक मिळत असल्याचे लक्षात येताच भाजप पदाधिका-यांवर नाराजी व्यक्त करत कलाटे चालू कार्यक्रमातून निघून गेले. तर, खासदार बारणे यांनी निवेदकाच्या बोलण्यातील चालाखी आणि एकंदरीत शिवसेनेबद्दलची भाजप पदाधिका-यांच्या मनातील कुत्सित भावना लक्षात येताच कार्यक्रमातून काढता पाय घेतला. यावरून शिवसेनेने पालिकेच्या कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याचे स्पष्ट झाले. याबाबत आयुक्त श्रावण हार्डीकर यांना निवेदन देणार असल्याचे गटनेते कलाटे यांनी सांगितले.

 

विरोधकांची लोकप्रियता घटविण्यासाठी भूमीपूजनाचा अट्टाहास

महापालिकेतील शिवसेनेचे गटनेते राहूल कलाटे हे चिंचवड विधानसभेचे आमदार लक्ष्मण जगताप यांचे प्रतिस्पर्धक आहेत. हा कार्यक्रम त्यांच्याच मतदार संघात येत असल्यामुळे कलाटे यांनी कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. मात्र, प्रतिस्पर्धक असल्याने जगताप आणि कलाटे यांच्यातून सध्या विस्तव जातो. त्यामुळेच कलाटे यांना कार्यक्रमात बेदखल वागणूक दिल्याचे बोलले जात आहे. तर, खासदार श्रीरंग बारणे यांनी पंधरा दिवसांपूर्वी लोकसभेच्या सभापती सुनेत्रा महाजन यांच्या हस्ते चापेकर बंधुंच्या टपाल तिकीटाचा अनावरण सोहळा याच भागात घेतला होता. या कार्यक्रमात भाजपचे आमदार जगताप अथवा भाजपच्या कोणत्याच पदाधिका-यांना निमंत्रीत केले नव्हते. महाजन यांच्या उपस्थितीमुळे खासदार बारणेंची वाढलेली लोकप्रियता घटविण्यासाठी भाजपच्या पदाधिका-यांनी चापेकर बंधुंच्या संग्रहालयाच्या दुस-या टप्प्याचे भूमीपूजन सोहळ्याचा अट्टाहास केला आहे. वास्तवीक या संग्रहालयाच्या पहिल्या टप्प्याचे काम सध्या मार्गी लागत आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button