मनपा शाळांमध्ये विद्यार्थ्यांसाठी पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसविणार
- महिला बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे यांचा निर्णय
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळावे यासाठी सर्व शाळांमध्ये पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसविण्यात येणार आहे. महिला व बालकल्याण समिती सभापती निर्मला कुटे यांनी सर्व शाळांची पाहणी केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. महापालिकेच्या इतिहासात प्रथमच ही यंत्रणा बसविण्यात येत असल्याचे निर्मला कुटे यांनी सांगितले.
महापालिकेच्या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना पिण्याचे पाणी उपलब्ध होत नाही. मिळाले तरी ते पाणी चांगल्या दर्जाचे नसते, अशा तक्रारी विद्यार्थी, शिक्षक व पालकांच्या वतीने वारंवार करण्यात येत होत्या. त्याची दखल घेत महिला व बालकल्याण सामिती सभापती निर्मला कुटे यांनी महापालिकेच्या काही शाळांची पाहणी केली.
या पाहणीत शाळांमध्ये तुटलेले नळ, नळाभोवती साचलेले शेवाळ आणि पाण्याच्या अस्वच्छ टाक्या आढळून आल्या. त्यामुळे महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात असल्याचे सभापती निर्मला कुटे यांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासोबत चर्चा करून शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची असणारी भयावह स्थिती कथन केली.
या चर्चेनंतर आमदार जगताप यांनी सर्व शाळांमध्ये पिण्याचे चांगले आणि शुद्ध पाणी उपलब्ध करून देण्याबाबत योग्य निर्णय घेण्याची सूचना सभापती निर्मला कुटे यांना केली. त्यानुसार सभापती निर्मला कुटे यांनी प्रशासनाकडे पाठपुरावा करून शाळांमध्ये पाणी शुद्धीकरण यंत्रणा बसविण्याचा अंतिम निर्णय घेतला आहे. महापालिकेच्या एकूण १२३ शाळांमध्ये १५० वॉटर फिल्टर आणि कुलर बसवण्याच्या निर्णयाला महिला व बालकल्याण समितीने मंजुरी दिल्याचे सभापती निर्मला कुटे यांनी सांगितले. त्यामुळे महापालिका शाळांमध्ये शिक्षण घेणाऱ्या गोरगरीब विद्यार्थ्यांना पिण्याचे शुद्ध व थंड पाणी मिळणार असल्याचेही त्यांनी सांगितले.