भोसरीत गणरायांची थाटात मिरवणूक; देखावे पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2018/09/IMG-20180922-WA0026.jpg)
पिंपरी ( कृष्णा जगदाळे) – बाप्पा मोरयाचा जय घोष…. ढोल ताशांचा दणदणाट… बँड व टाळ मृदंगाच्या गजरात… आर्कषक सजविलेल्या भोसरीतील ‘श्रीं’ची विसर्जन मिरवणूक थाटात काढण्यात येत आहे. अत्यंत जोशपूर्ण तसेच भावपूर्ण वातावरणात भोसरी परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी लाडक्या गणरायाला निरोप देण्यात येत आहे. विसर्जन मिरवणूक सोहळा पाहण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी उसळली आहे.
भोसरी परिसरातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणरायांचे विसर्जन शनिवारी (दि. २२) करण्यात आले. दुपारपासूनच घरगुती, सोसायटी व कंपनीतील गणरायाला वाजत-गाजत निरोप देण्यात येत आला. कही ठिकाणी गुलाल व भंडा-याची उधळण करण्यात आली. भोसरीतील मुख्य विसर्जन मिरवणुकीला सांयकाळी सहा वाजता सुरवात झाली. बापुजी बुवा चौकापासून पुढे ग्रामदैवत भैरवनाथ मंदीर, पीएमटी चौक अशी मिरवणूक मार्गस्थ झाली. पालिकेच्या वतीने उभारण्यात आलेल्या स्वागत कक्षात मंडळांच्या अध्यक्षांना सन्मानित करण्यात येत आहे.
सायंकाळी सुरु झालेल्या मुख्य विसर्जनाचे आकर्षक सजवलेले रथ पाहण्यासाठी नागरिकांनी व भाविकांनी विसर्जन मार्गावर दुतर्फा मोठी गर्दी केली. अनेक मंडळातील महिलांनी फुगड्यांचे फेर धरले. तसेच, विसर्जन मार्गावर आकर्षक रांगोळ्या काढण्यात आल्या. विसर्जन मिरवणुकीसाठी मंडळानी आर्कषक सजावट केली. पठारे लांडगे तालीम व्यायाम मंडळाने ढोल तशाच्या दणदणाटात फुलांनी सजविलेल्या ‘पुष्परथा’वरून गणरायांची मिरवणूक काढली. लांडगे लिंबाची तालीम मंडळाने ‘स्वराज्य’ रथामध्ये ‘श्रीं”ची वाजत गाजत मिरवणूक काढली. मिरवणुकीत काळेवाडी येथील तुळजाभवानी मर्दानी खेळ व युद्ध कला प्रशिक्षण मंडळाचा पंधरा कलाकारांनी प्रात्यक्षिके सादर केली. खेळाची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी मोठी गर्दी झाली होती. श्रीराम मित्र मंडळाने ढोल ताशा व बँड लावून आकर्षक ‘पुष्परथा’तून ‘श्री’ची विसर्जन मिरवणूक काढली.
लांडेवाडी येथील नव महाराष्ट्र तरुण मंडळाने आकर्षक फुलांनी सजवलेल्या ‘मयूर’ रथातून गणपतीची मिरवणुक काढली. शाळेचे ढोल लेझीम पथक, बँड व मंडळातील कार्यकर्त्यांनी एकसारखा केलेला पेहराव मिरवणुकीचे विशेष आकर्षण ठरले. आळंदी रोड येथील श्रीगणेश तरुण मंडळाने ढोल, ताशा व बँड चा गजरात फुलाने सजविलेल्या ‘पुष्प’ रथातून मिरवणूक काढली. समस्त गव्हाणे तालीम मंडळाने ढोल ताशा, बँड व ‘विठ्ठल’ रथातून मिरवणूक काढली.
छत्रपती श्री शिवाजी तरूण मित्र मंडळाने आकर्षक ‘भवानी’ रथातून मिरवणूक काढली. लोंढे तालीम मित्र मंडळाने ‘लेझर शो’ च्या माध्यमातून सामाजिक संदेश देत वाजत गाजत मिरवणूक काढली. फुगे माने तालीम मित्र मंडळाने ‘शिव’ रथातून मिरवणूक काढली. विसर्जन घाटावर पोलिस यंत्रणा, महापालिका प्रशासन,अग्निशामक दलाचे जवान, जीवरक्षक व आरोग्य विभागाचे कर्मचारी सज्ज आहेत.
पालिकेच्या वतीने बनविलेल्या कृत्रिम हौदात भाविकांनी तसेच भोसरीतील प्रमुख मंडळांनी ‘श्रीं’च्या मूर्ती विसर्जित केल्या. तसेच, पुष्पहार व पूजेचे इतर साहित्य वाहत्या पाण्यात न टाकता निर्माल्य कुंडीत टाकण्यात आले.