भोसरीत अपक्ष आमदारांची परंपरा खंडीत होणार की, पैलवान बाजी मारणार?
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/10/Bhosri.jpg)
- आमदार महेश लांडगे यांच्या विजयाची होतेय चर्चा
- माजी आमदार विलास लांडे यांना फटका बसणार?
पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी
चिंचवडनंतर भोसरी विधानसभा मतदार संघाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. निवडणूकपूर्व काळात भाजपचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांच्या बाजुने नागरिकांचा कौल दिसत होता. परंतु, शेवटच्या क्षणी माजी आमदार विलास लांडे यांनी वातावरण ढवळून सोडले होते. त्याचा थोडाबहुत परिणाम मतदारांवर पडणार यात शंका नाही. अशात मतदानाची टक्केवारी घटल्याने त्याचा फायदा नेमका कोणाला होणार, हा खरा प्रश्न आहे. या संदिग्ध परिस्थितीत महेश लांडगे बाजी मारणार की, विलास लांडगे विजयी होणार याबाबत कार्यकर्त्यांना चांगलीच उत्सुकता लागली आहे.
भोसरी विधानसभा मतदार संघात यावेळी 59 टक्के मतदान झाले. 2014 च्या निवडणुकीचा विचार केला तर 2 टक्क्यांची घसरण झाली आहे. त्याचा म्हणावा तेवढा फरक पडणार नसल्याचे बोलले जात असले तरी निवडणूक चुरशीची झाली आहे. भाजपचे उमेदवार महेश लांडगे आणि अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांच्यात जोरदार टस्सल बघायला मिळाली. त्यामुळे सध्यपरिस्थितीत महेश लांडगे यांचे पारडे जड वाटत असले तरी विलास लांडे यांनी सुध्दा चांगलीच कसरत पनाला लावली होती. ही मेहनत किती मतांमध्ये परावर्तीत होणार हे समोर येईलच. पण, भोसरीमध्ये महेश लांडगे यांच्या विजयाची जोरात चर्चा केली जात आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीत भोसरी मतदार संघात 60.89 टक्के मतदान झाले होते. 2009 च्या निवडणुकीत 48.17 टक्के मतदानाची नोंद झाली होती. तर, यावेळी 59 टक्के मतदान झाले आहे. या टक्केवारीत दर पाच वर्षांनी भर पडणे अपेक्षीत असते. परंतु, मतदानाची घसरण पहायला मिळली आहे. त्याचा फटका नेमका कोणाला बसणार आणि कोणाचा विजय होणार, हे येत्या 24 ऑक्टोबर रोजी निकालातून स्पष्ट होणार आहे.
शिवसेनेच्या भूमिकेवर कायमच प्रश्नचिन्ह
भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांचे काम करण्यासंदर्भात शिवसैनिकांमध्ये मतमतांतरे होती. ज्याअर्थी आमदार महेश लांडगे यांनी शिरूर लोकसभा मतदार संघात महायुतीचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्यासाठी सर्व ताकद पनाला लावली होती. त्याअर्थी आढळराव आणि भोसरीतील शिवसेनेचा त्यांचा गट आमदार महेश लांडगे यांच्यासाठी धावून येईल, असे वाटत होते. मात्र, सुरूवातीच्या काळात शिवसैनिकांनी महेश दादांच्या बाबतीत अप्रत्यक्षपणे कडवी भूमिका घेतली होती. शेवटी समेट घडवून आणत आमदारांनीच त्यांना कामाला लावल्याचे चित्र पहायला मिळाले होते. त्याचा मतांवर कितपत परिणाम पडला, हे निकालाच्या दिवशीच स्पष्ट होणार आहे.