भुताची भीती दाखवत 4 वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरीमध्ये चार वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. नागसेन परिसरातील ही घटना आहे. चिमुकलीला भुताची भीती दाखवत तिच्यावर अत्याचार करण्यात आल्याची संतापजनक माहिती समोर आली आहे. पीडित मुलीला ससून हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणी एका तडीपार गुंडास पोलिसांनी रात्री उशिरा ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. शहरात लैंगिग अत्याचाराच्या घडणाऱ्या घटनांबाबत नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
चिंचवड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बिजलीनगर परिसरात खेळत असणाऱ्या एका चार वर्षीय मुलीला भुताची भीती दाखवत तिला निर्जनस्थळी नेऊन नराधमानं तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. अंगणात खेळणाऱ्या मुलीचा शोध घेण्यासाठी तिचे कुटुंबीय धावपळ करत होते. काही वेळानंतर मुलगी स्वतःहून घरी आली. तिच्या अंगावरील जखमा पाहून पालकांनी तिला याबाबत विचारपूस केली असता,तिने ‘भागूचा काका’ असे म्हणत घडलेला प्रकार सांगितला.
यानंतर तिला तातडीनं उपचारांसाठी पिंपरीतील यशवंतराव चव्हाण रुग्णालयात दाखल केले. पुढील उपचारासाठी ससून येथे हलवण्यात आले. मुलीने केलेल्या वर्णनावरून पोलिसांनी एका तडीपार गुंडास ताब्यात घेतले असून चिंचवड पोलीस तपास करत आहेत.