भीमसृष्टीचे काम जुलैअखेर पूर्णत्वास लागणार, महापौर राहूल जाधव यांची माहिती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2019/06/pcmc-3.jpg)
- भीमसृष्टीच्या कामाची आढावा बैठक आज संपन्न
- महापौर जाधव आणि पक्षनेते एकनाथ पवार यांनी घेतली माहिती
पिंपरी, (महाईन्यूज) – पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारण्यात येणा-या भीमसृष्टीचे काम जुलै महिनाअखेर पूर्ण करण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव व पक्षनेते एकनाथ पवार यांनी अधिका-यांना दिल्या. तसेच, राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते भीमसृष्टीचे उद्घाटन करण्यात यावे, अशा सूचना सदस्यांनी केल्या आहेत.
पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात उभारण्यात येत असलेल्या भीमसृष्टीच्या कामकाजाचा आढावा व तेथे उभारण्यात येणा-या म्युरल्सच्या मसुद्याचे वाचन महापौर राहुल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित बैठकीत करण्यात आले. त्यावेळी सूचना देण्यात आल्या. यावेळी आमदार अॅड. गौतम चाबुकस्वार, अतिरिक्त आयुक्त संतोष पाटील, शहर सुधारणा समिती सभापती राजेंद्र लांडगे, शिवसेना गटनेते राहुल कलाटे, नगरसेवक सागर आंगोळकर, नगरसदस्या सुलक्षणा धर शिलवंत, समितीचे सदस्य अॅड. गोरक्ष लोखंडे, निवृत्त कार्यकारी अभियंता शरद जाधव, डॉ. राजाभाऊ भैलुमे, शिल्पकार आणि चित्रकार डॉ. गुरुगोविंद आंबरे, सहाय्यक आयुक्त अण्णा बोदडे, कार्यकारी अभियंता सुनिल वाघुंडे, वस्तूविशारद गिरीश चिद्दरवार आदी उपस्थित होते.
या भिमसृष्टीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावरील एकूण १९ म्युरल्स बसविण्यात येणार आहेत. त्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा जीवनपट मांडण्यात येणार आहे. म्युरल्सचे काम पूर्णत्वास आले असून उर्वरित स्थापत्य विषयक कामे जुलै महिना अखेर पूर्ण करण्याच्या सूचना महापौर राहुल जाधव व पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिल्या.
म्युरल्सची माहिती मराठी बरोबरच इंग्रजीमध्ये असावी अशा सूचना यावेळी करण्यात आल्या त्यावर योग्य ती कार्यवाही करण्यात येणार असल्याचे पक्षनेते एकनाथ पवार यांनी सांगितले. म्युरल्स समवेत लावण्यात येणा-या मसुद्यातील मजकूरावर यावेळी चर्चा करण्यात आली. त्यामध्ये काही दुरुस्त्या आमदार गौतम चाबुकस्वार यांनी सुचवल्या. त्यानुसार कार्यवाही करण्यात येणार असल्याचे यावेळी अधिका-यांनी सांगितले.
भीमसृष्टीचे उदघाटन ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात करण्याचे नियोजन करावे व त्या दृष्टीने तयारी करावी, अशा सूचना महापौर राहुल जाधव व पक्षनेते एकनाथ पवार यांनी दिल्या. तर, भीमसृष्टीचे उदघाटनासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांना निमंत्रित करावे, अशी मागणी उपस्थित सदस्यांनी केली.