भाजप नगरसेवक तुषार कामठे यांचा राजीनामा
- वैयक्तीक कारणास्तव वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य पदाचा दिला राजीनामा
- भाजप नगरसेवकांमध्ये वाढतोय असंतोष
पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपळे निलख येथील भाजप नगरसेवक तुषार कामठे यांनी महानगरपालिकेच्या वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य पदाचा राजीनामा दिला आहे. त्यांनी आपला राजीनामा महापाैर राहूल जाधव यांच्याकडे सोपविला आहे. वैयक्तिक कारणास्तव वृक्ष प्राधिकरण समितीत काम करण्यास वेळ मिळत नसल्याने हा राजीनामा देत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे नगरसेवक तुषार कामठे यांना वृक्ष प्राधिकरण समिती सदस्य पदावर मागील दोन वर्षापासून कार्यरत होते. त्यांना पक्षाने दिलेली जबाबदारी निष्ठेने सांभाळली आहे. पिंपरी चिंचवड शहर हरित करण्याचे त्यांनी अनेक उपक्रम राबविले आहेत.
तसेच आपण वैयक्तिक कारणास्तव या पदाचा राजीनामा देत असून त्या जबाबदारीस न्याय देवू शकत नसल्याने मला या पदाच्या जबाबदारीतून कार्यमुक्त करण्यात यावे, असे पत्रात म्हटले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक नगरसेवक नाराज
आगामी विधानसभा निवडणुकींच्या तोंडावर पिंपरी-चिंचवड शहरातील भाजपचे अनेक नगरसेवक नाराज आहेत. त्या नगरसेवकांना पक्षात मानसन्मान मिळत नाही, महानगरपालिकेत सत्ता असूनही प्रभागात कामे होत नसल्याने नगरसेवकांमध्ये असंतोषाचे प्रमाण वाढत चालले आहे. त्याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत भाजपला निश्चित बसणार आहे.