breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजपचे सदाशिव खाडे यांना प्राधिकरण अध्यक्ष पदाची लॉटरी; शहरात मुंडे गटाची सरशी

  • निष्ठावंतांना मिळाला अखेर न्याय

पिंपरी – आघाडी सरकार पायउतार झाल्यानंतर सत्तेवर आलेले भारतीय जनता पक्षाचे सरकार तरी पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाची निवड करेल, अशी अपेक्षा लागली होती. या राज्य सरकारने सत्तेची चार वर्षे पूर्ण झाल्यानंतर अध्यक्षपदाला न्याय दिला आहे. प्राधिकरणाच्या अध्यक्ष पदावर भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य सदाशिव खाडे यांची निवड जाहीर केली आहे.

 

सन १९७२ मध्ये स्थापन झालेल्या पिंपरी नवनगर विकास प्राधिकरणावर आतापर्यंत २१ शासकीय अधिकाऱ्यांनी अध्यक्ष म्हणून काम केले आहे. केवळ सात लोकनियुक्त अध्यक्षांनी प्राधिकरणाचा कारभार चालवला. सन २००१ ते २००४ पर्यंत कॉंग्रेसचे बाबासाहेब तापकीर हे अध्यक्ष होते. त्यांच्यानंतर प्राधिकरणाला लोकनियुक्त अध्यक्षपद मिळालेले नाही. त्यानंतर या पदावर विभागीय आयुक्तच अध्यक्ष म्हणून काम करत होते. आघाडी सरकारच्या काळात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या दोन्ही पक्षातील वादांमुळे या पदावर दोन्ही पक्षातील कोणत्याही कार्यकर्त्यांची निवड झाली नाही. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी त्यावेळी अनेक वेळा प्राधिकरणाचे अध्यक्षपद जाहीर करण्याची मागणी केली होती. मात्र, पक्षश्रेष्ठींनी दुर्लक्ष केले होते.

 

भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखाली राज्यात सत्ता स्थापन झाली. भाजप आणि शिवसेना हे पक्ष सत्तेत सहभागी असल्यामुळे या दोन्ही पक्षांतील कोणत्यातरी एका पक्षाच्या पदाधिकाऱ्याला प्राधिकरणाचे अध्यक्षपद मिळेल, अशी शक्यता वर्तवली जात होती. तब्बल चार वर्षे उलटून गेल्यानंतर सत्ताधारी भाजप सरकारने राज्यमंत्री दर्जा असलेल्या महामंडळांवर पदांची घोषणा केली आहे. त्यात पिंपरी-चिंचवड नवनगर विकास प्राधिकरणाच्या अध्यक्ष पदावर भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा भाजपचे माजी शहराध्यक्ष सदाशिव खाडे यांची निवड जाहीर केली आहे.

 

 

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button