भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पिंपरी-चिंचवड दौऱ्यावर; दोन्ही आमदारांची अनुपस्थिती
![](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/01/WhatsApp-Image-2020-01-05-at-18.03.35.jpeg)
राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा कामगार प्रतिनिधी मेळावा
भाजपच्या नगरसेवकांचीही उपस्थिती नगण्य
पिंपरी। महाईन्यूज । प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी प्रणित राष्ट्रीय श्रमिक आघाडीचा राज्यस्तरीय कामगार प्रतिनिधी मेळाव्याच्या निमित्ताने भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील रविवारी सायंकाळी पिंपरी-चिंचवड शहरात आले होते. मात्र, या कार्यक्रमाला पक्षाचे विद्यमान शहराध्यक्ष आणि आमदार लक्ष्मण जगताप, तसेच भोसरीचे आमदार महेश लांडगे यांची अनुपस्थिती दिसली.
विशेष म्हणजे, पक्षाचे ७७ लोकनियुक्त नगरसेवकासह स्वीकृत नगरसेवकांची फौज असतानाही प्रदेशाध्यक्षांच्या कार्यक्रमाला मात्र हाताच्या बोटावर मोजण्या ऐवढेच नगरसेवक उपस्थित दिसले.
संत तुकारामनगर, पिंपरी येथील आचार्य अत्रे रंगमंदिर येथे हा कार्यक्रम झाला. यावेळी राज्यसभा खासदार अमर साबळे, लोकलेखा समितीचे अध्यक्ष ॲड. सचिन पटवर्धन, पिंपरी-चिंचवड नवनगर विकास महामंडळाचे अध्यक्ष सदाशीव खाडे, राष्ट्रीय श्रमिक आघाडीचे अध्यक्ष यशवंत भोसले, प्रदेश सरचिटणीस उमा खापरे, स्थानिक नगरसेविका सुजाता पालांडे, माजी नगरसेवक राजू दुर्गे अशी मोजकी मंडळी व्यासपीठावर उपस्थित दिसली.
दरम्यान, शहर भाजपच्या कार्यकर्त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचे ढोल-ताशांच्या गजरात स्वागत केले. फटाकांच्या आतषबाजीही करण्यात आली.