breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बोपखेल पूल व रस्त्याच्या जागेपोटी लष्कराला येरवड्यातील जागा देणार – आमदार लक्ष्मण जगताप

पिंपरी, (महाईन्यूज)  – बोपखेल गावासाठी मुळा नदीवर पूल आणि रस्ता तयार करण्यासाठी आवश्यक असलेल्या चार एकर जागेच्या मोबदल्यात येरवडा येथील तेवढीच जागा लष्कराला देण्याचा अंतिम निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. लष्करानेच येरवडा येथील सर्व्हे क्रमांक २०२/२ मधील चार एकर जागेची निवड केली आहे. या जागेचा सातबारा उतारा, आवश्यक नक्कल, मालमत्ता कार्डसह इतर सर्व कागदपत्रे देण्याचे पत्र तहसीलदारांना पाठविले आहे. त्यामुळे बोपखेलसाठी मुळा नदीवर पूल आणि कायमचा रस्ता तयार करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी दिली.

  • मुळा नदीवर पूल आणि रस्ता करण्याच्या कामाला तातडीने मंजुरी देण्याबाबत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीला सूचना केल्याचेही आमदार जगताप यांनी सांगितले. बोपखेलकरांनी हक्काच्या रस्त्यांसाठी अनेक वर्षांपासून केलेल्या संघर्षाचा आणि संयमाचा हा मोठा विजय असल्याची प्रतिक्रिया स्थानिक नगरसेविका हिराबाई घुले आणि शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले यांनी दिली.

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील बोपखेलवासीय वर्षानुवर्षे दापोडी येथील सीएमईच्या हद्दीतील रस्त्याचा रहदारीसाठी वापर करत होते. परंतु, सीएमईने हा रस्ता वाहतुकीसाठी बंद केल्याने बोपखेलवासीयांना सध्या पिंपरी-चिंचवड किंवा पुण्यात जाण्यासाठी मोठा वळसा घालावा लागत आहे. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिकेने मुळा नदीवर बोपखेल आणि खडकीला जोडणारा पूल उभारून रस्ता करण्याचा निर्णय घेतला. परंतु, पूल आणि रस्त्यासाठी पुन्हा लष्कराच्याच चार एकर जागेचे संपादन करावे लागणार होते. महापालिका आणि लोकप्रतिनिधींनी पाठपुरावा केल्यानंतर लष्कराने आधी चार एकर जागेचा मोबदला मागितला. त्यानुसार जागेची मोजणी करण्यात आली. त्यानंतर बाजारभावानुसार या जागेपोटी लष्कराला २५ कोटी ८१ लाख रुपये देण्यास महापालिका राजी झाली.

  • मात्र, नंतर लष्कराने जागेच्या मोबदल्यात जागेचीच मागणी केली. लष्कराची जागेची मागणी राज्य सरकारच्या पातळीवर पूर्ण होणे अपेक्षित होते. त्यामुळे भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप, भाजपच्या स्थानिक ज्येष्ठ नगरसेविका हिराबाई घुले, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. आमदार जगताप यांच्या सततच्या रेट्यामुळे मुख्यमंत्री फडवणवीस यांनी कडक शब्दांत समज दिल्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी लष्कराला जागेच्या मोबदल्यात जागा देण्याची कार्यवाही सुरू केली. बोपखेलच्या रस्त्यासाठी जागा घेण्याच्या मोबदल्यात पुणे किंवा पिंपरी-चिंचवडमधील सरकारची तेवढीच जागा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला.

त्यानुसार पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील जागांची पाहणी करण्यात आली. त्याचा अहवाल पुणे जिल्हाधिकारी आणि लष्कराच्या संबंधित अधिकाऱ्यांना सादर करण्यात आला. त्यानुसार लष्कराने येरवडा येथील सर्व्हे क्रमांक २०२/२ मधील जागेला पसंती दिली आहे. या जागेचा सातबारा उतारा, आवश्यक नक्कल, मालमत्ता कार्डसह इतर सर्व कागदपत्रे देण्याबाबत मेजर अर्शदिप सिंग यांनी तहसीलदार तृप्ती कोलते यांना पत्र पाठविले आहे. पुणे जिल्हाधिकाऱ्यांनी येरवडा येथील संबंधित जागा लष्कराला देण्याची प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करण्याची ग्वाही दिली आहे, अशी माहिती भाजप शहराध्यक्ष व आमदार लक्ष्मण जगताप यांनी सांगितले. आता मुळा नदीवर पूल उभारणे आणि त्यापुढे रस्ता करण्याच्या निविदेला पिंपरी-चिंचवड महापालिका स्थायी समितीची लवकरात लवकर मंजुरी मिळणे आवश्यक आहे. त्याबाबत स्थायी समितीला सूचनाही करण्यात आल्याचे आमदार जगताप यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button