बोगस एफडीआर प्रकरण; ‘त्या’ ठेकेदारांवर ‘420’ चा गुन्हा दाखल होणार
![बोगस एफडीआर प्रकरण; 'त्या' ठेकेदारांवर '420' चा गुन्हा दाखल होणार](https://mahaenews.com/wp-content/uploads/2020/03/pcmc-14.jpg)
पिंपरी पोलिसांना महापालिकेची लेखी तक्रार, 18 ठेकेदारांच्या अडचणी वाढल्या
पिंपरी |महाईन्यूज|
महापालिकेत बोगस एफडीआर आणि बॅंक हमी देवून कामे घेणा-यांना ठेकेदारांनी महापालिकेची फसवणूक केली आहे. त्या 18 ठेकेदारांना काळ्या यादीत टाकले आहे. परंतू, या पुढे कोणत्याही ठेकेदाराने महापालिकेची फसवणूक करु नये, म्हणून त्या ठेकेदारावर फाैजदारी कारवाईच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. त्यानूसार पाच ठेकेदारांविरोधात फसवणूकीचे गुन्हे दाखल करण्याबाबत पिंपरी पोलिसांना लेखी पत्र दिले आहे. त्यामुळे ठेकेदारांमध्ये खळबळ उडाली आहे.
पिंपरी चिंचवड महापालिका स्थापत्य विभागाचे प्रशासन अधिकारी रमेश वस्ते यांनी याबाबत पिंपरी पोलीस ठाण्यात लेखी अर्ज दिला आहे. बोगस एफडीआर दिल्याप्रकरणी डीडी कन्सट्रक्शन (दिनेश मोहनलाल नवानी), वैदेही कन्सट्रक्शन (दयानंद जीवन माळगे), एसबी सवाई (संजय बबन सवई), मेसर्स पाटील ॲण्ड असोसिएट (सुजीत सुर्यकांत पाटील) आणि कृती कन्स्ट्रक्शन (विशाल हनुमंत कु-हाडे) यांच्यावर फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात यावेत, असे पत्र दिले आहे.
महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडील कामांसाठी हे पाच ठेकेदार प्रथम लघुत्तम असल्याने त्यांनी निविदा अटी-शर्तीनुसार अतिरिक्त सुरक्षा अनामत (पीएसडी) व सुरक्षा अनामत (एसडी) महापालिकेकडे जमा करणे आवश्यक होते. सदर रकमेपोटी संबंधित ठेकेदारांनी सादर केलेली फिक्स्ड डिपॉझिट रिसीट (एफडीआर) आणि बँक हमी पडताळणीकामी पाठविली. त्यात बँकांनी एफडीआर आणि बँक हमी या ठेकेदारांना दिली नसल्याचे सांगितले.
दरम्यान, या ठेकेदारांनी बनावट एफडीआर, बँक हमी सादर करुन महापालिकेची फसवणूक केली आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध 420 कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात यावा, असे महापालिकेने पोलिसांना दिलेल्या लेखी अर्जात म्हटले आहे. सोबत कागदपत्रे देखील दिली आहेत.
‘या’ 13 ठेकेदारांवर होणार गुन्हे दाखल
श्री दत्त कृपा एंटरप्रायजेस (दत्तात्रय महादेव थोरात), सोपान जनार्दन घोडके (सोपान जनार्दन घोडके), दीप एंटरप्रायजेस (पूर्वा ठाकूर), बीके खोसे (भास्कर खंडू खोसे), बीके कन्सट्रक्शन ॲण्ड इंजिनिअरिंग (परमेश्वर हणमंत क्याटनकारी), एचए भोसले (हनुमंत भोसले), भैरवनाथ कन्सट्रक्शन (नंदकुमार मथुराम ढोबळे), डीजे एंटरप्रायजेस (ज्योती दिनेश नवानी), म्हाळसा कन्सट्रक्शन प्रा. लि (आकाश श्रीवास्तव), अतुल आरएमसी (अतुल चंद्रकांत रासकर), चैतन्य एंटरप्रायजेस (अपर्णा महेश निघोट), त्रिमुती कन्सट्रक्शन (संदीप लोहर) आणि राधिका कन्सट्रक्शन (अटल बुधवाणी) या 13 ठेकेदारांवर देखील फसवणुकीचे गुन्हे दाखल केले जाणार आहेत.
”बोगस एफडीआर प्रकरणी गुन्हे दाखल करण्याबाबत महापालिकेचा लेखी तक्रार अर्ज प्राप्त झाला आहे. कागदपत्रांची पडताळणी करुन दोषींवर गुन्हे नोंदविण्यात येतील”.- मिलींद वाघमारे वरिष्ठ पोलिस निरीक्षक, पिंपरी पोलिस ठाणे